केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांनी अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कमेसाठी दुकानदारांकडे अर्ज करावेत

जालना/प्रतिनिधी,दि.13
जिल्ह्यातील एपीएल केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम योजनेबाबतचा अर्ज भरुन संबंधित रास्तभाव दुकानदार यांचेकडे जमा करावेत व या योजनेचा एपीएल (केशरी) शेतकरी लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती आर. एम. बसैय्ये यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
शासन निर्णय दि. 28 फेब्रुवारी 2023 अन्वये औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपुर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरु करण्यात आलेली आहे. जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत सामाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी ) शिधापत्रीकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्या ऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये रोख रक्कमेच्या थेट हस्तांतरणाची (डिबीटी) योजना कार्यान्वित करण्यास शासनाकडून मान्यता मिळाली आहे. शेतकरी योजनेच्या लाभासाठी आरसीएमएसवर नोंद असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांकडून आवश्यक असलेला बँक तपशील ऑफलाईन ऑनलाईन भरुन घेण्यात येणार आहे. पात्र एपीएल शिधापत्रिकाधारकांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत बँक पासबुक, आधारकार्ड, रेशनकार्ड व सातबारा संबंधित स्वस्तधान्य दुकानदारांकडे देण्यात यावी. या योजनेअंतर्गत वितरीत करावयाची रोख रक्कम महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल. महिला कुटुंब प्रमुखाचे कोणत्याही बँकेत खाते नसल्यास कुटुंब प्रमुख महिलेस बँक खाते सुरु करणे आवश्यक आहे. जालना जिल्ह्यात एकूण 1 लाख 43 हजार 12 लाभार्थ्यांना डिबीटी योजनेचा लाभ होणार असून अधिक माहितीसाठी तालुकास्तरावरील पुरवठा विभागातील अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.