जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतनीकरण केलेल्या महसूल भवनचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन
जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून खेळाडुंना ट्रॅकसुट, किट व शुजचे वितरण

जालना/प्रतिनिधी,दि.14
जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतनीकरण केलेल्या महसूल भवनचे आज रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. अद्यावत अशा महसूल भवनाचे श्री. दानवे यांनी यावेळी कौतुक करुन जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमास आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सूनील सूर्यवंशी, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. एन. चिमंद्रे, भास्करआबा दानवे, बद्री पठाडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी महसूल भवनचे श्री. दानवे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन झाले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते महिला व बाल विकास विभागामार्फत आयोजित जिल्हास्तर चाचा नेहरु महोत्सवात सहभागी बालगृहातील खेळाडू बालकांना आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातंर्गत खो-खो व फूटबॉलचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडुंना ट्रॅकसुट, किट व शुजचे वितरण करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून हे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
श्री. दानवे यांनी मार्गदर्शन करताना खेळाडु बालकांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आज आपला देश विविध क्षेत्रात वेगाने प्रगती करीत आहे. पायाभूत सुविधा मजबूत केल्यामुळे रेल्वे, रस्ते, विमानतळ, नवीन संसद भवन व अन्य शासकीय इमारतींचे अद्यावतीकरण करण्यात आले आहे. जगात आपल्या देशाचा नावलौकिक वाढला आहे. जी-20 परिषदेचे अध्यक्षपद भारताला लाभले. या परिषदेतील सर्व देशांनी विकसित भारताचे कौतुक केले. विविध क्षेत्राचा करण्यात आलेला विकास व अद्यावतीकरणामुळे भारताची जगाच्या पटलावर एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी, नागरिक, खेळाडू उपस्थित होते.