“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना/प्रतिनिधी,दि.2
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी राज्य शासनाने “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यावर दर महिन्याला रु. 1500/- इतकी रक्कम दिली जाणार आहे. अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, महापालिकेचे वार्ड ऑफीस, सेतू सुविधा केंद्र व ई-सेवा केंद्र येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज दाखल करता येणार आहे. तरी जालना जिल्हयातील इच्छुक पात्र महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे अवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे, त्यामुळे महिलांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करु नये. तसेच एजंट अथवा दलालापासून सावध राहावे. योजनेचा अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रीया विनामूल्य आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.
“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण” या योजनेचा शासन निर्णय दि. 28 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आला. या योजनेची माहिती खालीलप्रमाणे आहेत.
योजनेच्या पात्रतेसाठी लाभार्थीचे निकष – लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे. लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
लाभार्थी महिलांना त्यांच्या गावातील ई-सेवा केंद्र, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामपंचायत यांच्या कार्यालयात जाऊन अर्ज ऑनलाईन करता येतील. अर्ज पोर्टल/मोबाईल ॲपव्दारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला ( वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य ), बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत, ऑनलाईन फोटो, रेशनकार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. स्टॅम्पपेपरची आवश्यकता नाही. एजंट व दलालापासून सावध राहावे. तक्रार असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा.
योजनेच्या अंमलबजावणीचे वेळापत्रक याप्रमाणे – दि. 1 जुलै 2024 पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात. 15 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटचा दिनांक, दि. 16 तात्पुरती यादी प्रकाशन, दि.16 ते 20 जुलै 2024 तात्पुरत्या यादीवर हरकती प्राप्त करणे, दि.21 ते 30 जुलै तक्रारी व हरकतींचे निराकरण, दि.1 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम लाभार्थी यादी प्रकाशन, दि.10 ऑगस्ट लाभार्थ्यांचे बॅंकेमध्ये ई-केवायसी करणे, दि.14 ऑगस्ट 2024 लाभार्थ्यांच्या निधीचे हस्तांतरण करणे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नवनाथ वामन यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.