करंजा येथे ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेची स्थापना.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.19
ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध सेवा सवलती मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने उरण तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या करंजा येथे ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सदर संस्थेचे उदघाटन चाणजे ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अमित भगत यांनी केले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सध्याच्या धक्काधक्कीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या युगात ज्येष्ठांच्या विविध समस्यांकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. ज्येष्ठांना वृद्धापकाळात कोणताही आधार नसतो.त्यामुळे ज्येष्ठांच्या विविध समस्या सोडविण्याचा माझा प्राधान्यक्रम असेल. शासनाच्या विविध सेवा सुविधा ज्येष्ठांना, पुरविण्यासाठी मी विशेष लक्ष देईन असे आश्वासन सरपंच अमित भगत यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिला. यावेळी ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था करंजाचे संस्थापक तथा कार्याध्यक्ष राजेंद्र घरत, अध्यक्ष प्रकाश धळी, उपाध्यक्ष – रामकृष्ण म्हात्रे, सचिव- अशोक थळी, सहसचिव प्रकाश म्हात्रे, खजिनदार विजय गाडे, सहखजिनदार धनाजी सोनकर, सदस्य दत्तात्रेय पांडुरंग,मोहन थळी, हरेश पढी, पद्माकर थळी,जयवंत थळी, दत्तात्रेय पाटील, संजय थळी, गीता पारकर, पाचुबाई थळी यांच्यासह करंजा , साईनगर, द्रोणागिरी नगर, सातघर, नवापाडा, भिंडी बाजार,सुरखीचापाडा,बापदेव पाडा, कोंढारीपाडा,कासवलेपाडा, आणि करंजा परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.करंजा येथे ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था स्थापन झाल्याने ज्येष्ठांच्या विविध समस्या मार्गी लागणार आहेत.त्यासाठी ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थाचे सर्व पदाधिकारी व सदस्य विशेष मेहनत घेत आहेत.