“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना जालना जिल्हयात प्रभावीपणे राबवावी– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना/प्रतिनिधी,दि.12
महिलांसाठी राज्यशासनाने “मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केलेली आहे. जालना जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करुन योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करावी. या योजनेतंर्गत सर्वात जास्त अर्ज नोंदणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांची तालुकानिहाय निवड करुन 15 ऑगस्टला त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने गौरव करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
“मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण” योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे बुधवारी (10 जुलै) आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस सर्व नगर परिषद, नगर पालिकांचे मुख्याधिकारी, जालना महानगर पालिकाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरीक्षेत्र) अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका (नागरी क्षेत्र), “मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण” योजनेसाठी नियुक्त वार्डाधिकारी, कर्मचारी (नगर परिषद/नगर पालिका) क्षेत्र कर्मचारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, “मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना योजनेची संपूर्ण माहिती सांगावी. पात्रता निकष, अपात्र निकष लाभार्थ्यांना सांगण्यात यावेत. तसेच लाभार्थ्यांना अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे सुलभपणे उपलब्ध करुन द्यावीत. कोणत्याही महिलेला अर्ज भरताना अडचण भासू देऊ नये.
अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पध्दतीने स्वीकारण्यात यावे. यासाठी प्रत्येक वार्डनिहाय, प्रभागनिहाय नियोजन करण्यात यावे. त्यानुसार अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व त्याची प्रसिध्दी करण्यात यावी. अशा सूचना सर्व मुख्याधिकारी यांना देण्यात आल्या.
सर्व तालुक्यांमध्ये सर्वात जास्त अर्ज नोंदणी व उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी यांचा विशेष पुरस्कार देवुन गौरव करण्यात येईल.
यावेळी जालना जिल्ह्यातील सर्व पात्र महिला लाभार्थींची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी “नारीशक्ती अॅप”मध्ये नोंदणी कशी करावी, याबाबतचे प्रशिक्षण पार पडले. तसेच अंगणवाडी सेविका, नगरपालिका कर्मचारी यांना अर्ज प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालयाकडून प्रशिक्षणही देण्यात आले आहे.