जालना शहरात राज्यस्तरीय मानसिक आरोग्य चर्चासत्राचे आयोजन
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.9
संपूर्ण जगात मानसिक आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून घोषित केला आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जालना शहरात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जालना, कर्मयोगी अंकुशराव टोपे महाविद्यालय, विप्र फाउंडेशन व १०० शिक्षक क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ राज्यस्तरीय मानसिक आरोग्य चर्चासत्र २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये डिप्रेशन, फोबिया, आक्रमकता यासारखे मानसिक आजार तसेच मोबाईलचा दुष्परिणाम मोठ्याप्रमाणात दिसू लागले आहेत यासाठी शाळांमध्ये समुपदेशन करण्यासाठी शिक्षकांना अविरतचे प्रशिक्षण दिले आहे. याशिवाय शिक्षक व पालकांमध्ये या विषयाची जाणिव जागृती निर्माण व्हावी, मानसिक आजारांवर मोकळेपणाने चर्चा व्हावी यासाठी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० ते ४.०० हे चर्चासत्र अंकुशराव टोपे महाविद्यालयात होणार आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ अपर्णा अष्टपुत्रे यांच्या हस्ते होणार आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दादासाहेब गजहंस असतील तर प्रमुख वक्ते म्हणून मानसशास्त्रज्ञ डॉ संदीप शिसोदे, छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ विक्रम सारूक, शिक्षणाधिकारी माध्यमिक बाळासाहेब खरात हे उपस्थित राहणार आहेत.
परिसंवादात डॉ अष्टपुत्रे या “आनंदशास्त्र : सकारात्मक मानसिकतेचा प्रवास मिश्र भाष्य करणार आहेत तर डॉ शिसोदे हे “एकाकीपणा : नव्या युगाचे मानसिक संकट” या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर द्वितीय सत्रात चर्चासत्र होणार असून त्यात चर्चा करण्यासाठी मानस हाॅस्पिटलचे डॉ प्रकाश आंबेकर, मानसशास्त्रज्ञ डॉ वर्षा मुळे, बाल मनोविकार तज्ज्ञ डॉ चिन्मय बाऱ्हाळे हे संवाद साधणार आहेत. या सत्राचे अध्यक्ष विप्र फाउंडेशनचे अध्यक्ष रामविलास गौड, प्रमुख उपस्थिती १०० शिक्षक क्लबचे अध्यक्ष राजेभाऊ मगर, आर आर जोशी हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील २०० शिक्षक सहभागी होणार आहेत अशी माहिती आयोजक मानसशास्त्र विभाग प्रमुख, डॉ सुजाता देवरे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ प्रमोद कुमावत यांनी दिली.
