टेंभुर्णी कामगार सुरक्षा संच वाटपातील गैरव्यवहाराबाबत संताप

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.26
टेंभुर्णीबांधकाम व इतर असंघटित कामगारांसाठी मुंबई येथील बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत सुरक्षा संच (शी३८ ङ३) वाटप सुरू आहे. मात्र टेंभुर्णी येथील पात्र कामगारांना सुरक्षा किट मिळत नसल्याने आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून दमदाटी केली जात असल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या आठवडाभरापासून टेंभुर्णीतील अनेक कामगारांना सुरक्षा संच मिळावा म्हणून 20 किमी अंतरावर असलेल्या राजूर केंद्रात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. दिवसभर केंद्रावर बसूनही किट मिळत नाही, तर काही ‘निवडक’ कामगारांना मात्र गावातच किट देण्यात येत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. कामगारांनी सांगितले की वाटप केंद्रातील संबंधित कर्मचारी चौकशी केल्यावर उद्धट भाषेत उत्तर देत आहेत. तुम्हाला किट देत नाही, काय करायचं ते करा ! अशाप्रकारे दमदाटी आणि अपमानास्पद भाषा कर्मचाऱ्यांकडून वापरली जात
असल्याचे कामगारांच्या म्हणण्यानुसार स्पष्ट झाले. टेंभुर्णीतील मोठ्या संख्येने कामगार पात्र असतानाही त्यांना किट नाकारण्यात येत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत केंद्रात थांबूनही शेवटी रिकाम्या हाताने घरी परतावे लागते, यामुळे कामगारांच्या आर्थिक, मानसिक नुकसानीत भर पडत आहे.
या संपूर्ण गैरव्यवहाराचा निषेध करत संतप्त कामगारांनी शनिवारी राजूर पोलीस चौकीत निवेदन देऊन योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदन देणाऱ्यांमध्ये शेख अर्शद, मुबारक पठाण, मंगेश बंगाळे, अयासखा पठाण, सांडू धनवई, दिनकर उखर्डे, शिवाजी देशमुख आदी कामगारांचा समावेश होता.
कामगारांनी पोलिस प्रशासनाला मागणी केली आहे की, किट वाटपातील भेदभावाची चौकशी करण्यात यावी. कामगारांशी केलेल्या उद्धट वर्तनाची नोंद घेऊन कारवाई करावी. टेंभुर्णीसाठी स्वतंत्र किट वितरण केंद्राची व्यवस्था करावी.



