76 वा भारतीय संविधान दिन सिद्धार्थ महाविद्यालयात उत्साहात साजरा

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.26
जाफराबाद सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 76 वा भारतीय संविधान दिन अत्यंत उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाल्यानंतर संविधान दिनाच्या औचित्याने कार्यक्रमाला विधिवत सुरुवात झाली. कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन प्रा.एस.एम.पाटील यांनी करून सर्व उपस्थितांना संविधानातील मूल्यांची जाण करून दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. एस .एल . मेढे यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून संविधानाने दिलेल्या अधिकार–कर्तव्यांचे महत्त्व, लोकशाहीची जडणघडण आणि विद्यार्थ्यांनी जपावयाच्या संविधानिक मूल्यांवर सखोल प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. एस. एम. पवार यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, त्यामागील विचारसरणी, सामाजिक न्यायाची तत्त्वे आणि डॉ. आंबेडकरांचे योगदान या सर्वांवर समग्र आणि सखोल मार्गदर्शन केले.प्रा.पवार यांनी आपल्या भाषणात 26नोंव्हेंबर 1949 भारतीय लोकशाहीचा जन्म दिवस आहे,या दिवशी मानवतेचे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी असंख्य संघर्ष, बुद्धीमत्ता आणि दूरदृष्टी यांचा संगम करून भारतीय संविधान राष्ट्राला अर्पण केले.हे संविधान फक्त कागदावरच लिहिलेले वाक्य नाहीत,ते आहे न्यायाचे वचन,समतेची हमी, स्वातंत्र्याचा श्र्वास आणि बंधुभावाची दिशा. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या या महान ग्रंथाने ” अबोलांना आवाज दिला.., वंचितांना अधिकार दिला.., आणि भारताला खऱ्याअर्थाने लोकशाही दिला.शेवटी ते म्हणाले आजच्या या पवित्र दिनी आपण सर्वांनी पुन्हा स्मरण ठेऊया.. ” संविधान हा आपला अभिमान आहे.आणि डॉ बाबासाहेबांचा मार्ग हा आपला प्रकाश आहे”. त्यांच्या भाषणाने उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सरिता मणियार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एस. आर. पहारे यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी विचार मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य विनोद हिवराळे , राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शिवाजी जगतवाड, तसेच डॉ. सारिका जाधव मॅडम प्रसिद्धी प्रमुख प्रा.अनिल वैद्य, डॉ.सुनंदा सोनुने यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन मूल्य शिक्षण समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमास विद्यार्थी- विद्यार्थीनिनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संविधानाबद्दलची बांधिलकी पुनर्जागरित केली. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मूल्यशिक्षण समितीतील सर्व सदस्य व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रदीप मिसाळ यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली .



