महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या सिंधी बाजार येथील निजाम काळापूर्वी छलावा जिंदाशा मदार या नावाचे प्राचिन धार्मिक स्थळ असून त्या ठिकाणी आता मनिष कॉम्प्लेक्स या नावाने मोठी ईमारत बांधण्यात आली असली तरी सदर बांधकाम त्वरीत पाडण्यात यावे, अशी मागणी पत्रकार विकासकुमार बागडी यांनी केली आहे.
यासंदर्भात महानगर पालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या लेखी निवेदनात पत्रकार विकासकुमार बागडी यांनी म्हटले आहे की, सदर धार्मिक स्थळाची शासन नोंद असून या धार्मिक स्थळाच्या दर्शनासाठी आणि ईबादत साठी हिंदु- मुस्लीमसह सर्व जातीधर्माचे लोक आपली श्रध्दा आणि भावनेनुसार येतात. काही वर्षापूर्वी त्रिलोकचंद कुंदनमल पाटणी नावाच्या भुखंड माफीयाने बोगस कागदपत्राआधारे या धार्मिक स्थळावर मनिष कॉम्प्लेक्स उभारुन त्याचे गाळे व दुकाने विक्री केलेले आहेत. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ता आणि नागरीकांच्या तक्रारीवरुन मा. मुख्याधिकारी साहेबांच्या आदेशावरुन तत्कालीन स्वच्छता निरिक्षक पंढरीनाथ बोकन यांनी 6 जून 2010 रोजी त्रिलोकचंद पाटणीविरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. तरी सुध्दा धार्मिक स्थळावरुन अतिक्रमण काढण्यात आलेले नाही. सदर अतिक्रमणामुळे येणार्या भाविकांना त्रास होत असून आपण तात्काळ मनिष कॉम्प्लेक्सची चौकशी करुन सदर मनिष कॉम्प्लेक्स पाडण्यात यावे, आमच्या विनंती किंवा अर्जाला न्याय न मिळाल्यास आम्हाला आमरण उपोषणाला बसावे लागेल. त्याची जबाबदारी आपल्यावर राहणार असल्याचा इशाराही पत्रकार श्री. विकासकुमार बागडी यांनी दिला आहे.