समाज कल्याण विभागाचे महाविद्यालयांना आवाहन – अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारु नये
जालना/प्रतिनिधी,दि.20
इयत्ता दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले असून वर्ष 2024-25 शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ तसेच व्यावसायिक महाविद्यालयांनी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारु नये तसेच शुल्क भरले नाही या कारणास्तव प्रवेश नाकारु नये, असे आवाहन जालना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
समाज कल्याण कार्यालयाकडून भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत इयत्ता अकरावी व त्यापुढील सर्व व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व इतर शुल्काची प्रतिपुर्ती करण्यात येते. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखाच्या आत आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्कासह निर्वाह भत्ता देण्यात येत असतो. एखाद्या महाविद्यालयाने अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील तसेच ज्या विद्यार्थ्यांने शासनाकडून विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्यापैकी 60 टक्के शुल्क महाविद्यालयांत जमा केले आहे व ज्या विद्यार्थ्यांचे 60 टक्के शुल्क शासनाकडून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर अद्यापपर्यंत जमा झाले नाही अशा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क व इतर कोणतेही शुल्क आकारल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित महाविद्यालयावर शासन नियमानूसार योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.