उरणमध्ये शेकापला मोठा हादरा; निलेश म्हात्रे यांच्यासह शेकापचे डॅशिंग कार्यकर्ते भाजपात

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5
उरण विधानसभा मतदार संघातील उरण पूर्व विभागातील शेकापचे युवा नेते निलेश म्हात्रे यांच्यासह उरण पंचायत समितीच्या माजी सभापती समिधा निलेश म्हात्रे, तसेच आवरे येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे उरणमध्ये शेकापक्षाला मोठा हादरा बसला आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा पनवेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रवेश देण्यात आला.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार सुरेश लाड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, उरण मंडल अध्यक्ष रवी भोईर, खालापूर अध्यक्ष प्रवीण मोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी, विविध मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष व सरचिटणीस, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
निलेश म्हात्रे यांच्यासह समिधा म्हात्रे, आवरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भार्गव ठाकूर, प्रगती म्हात्रे, बाळू जनार्दन गावंड, माजी उपसरपंच मनोज गावंड, ग्रामपंचायत सदस्य अविनाश गावंड, रोहन गावंड, अनंत गावंड, अनंत कडू, नामदेव म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, सोमनाथ म्हात्रे, दिनानाथ गावंड,आर्यन भोईर, माजी सदस्य चंद्रशेखर थळी, राजेंद्र म्हात्रे, आवरे माजी शाखाप्रमुख पद्माकर गावंड यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपात प्रवेश केला.
———————————————————
लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात इच्छा असूनही आम्हाला सहभागी होता येत नव्हते. सद्यस्थितीत शेतकरी कामगार पक्ष काहीसा हतबल झाल्यामुळे आमच्या सारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांना बंधने येत होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने केलेला विकास व देशाची प्रगती पाहून आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, युवा नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला असून पक्ष नेतृत्व देईल ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडू. – निलेश म्हात्रे