काजळा-पानखेडा रस्त्याची लागली वाट!
काजळा-पानखेडा रस्ता वीस वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत!

जालना/प्रतिनिधी, दि.10
अंबड-जालना महामार्गावरील काजळा-पानखेडा हा चार किलोमीटरचा रस्ता दहा गावांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे, केवळ दोन तालुक्यांच्या हद्दीच्या प्रश्नावरून २० वर्षापासून हा रस्ता दुर्लक्षित आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न या गावांतील गावकऱ्यांनी आमदारापासून मुख्यमंत्र्यांपुढे जाऊन मांडला. मात्र, त्यानंतरही या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहन नेणे म्हणजे जिवाशी खेळ करण्यासारखे होते. खराब रस्त्यामुळे जीव जाण्याची भीती या रस्त्यावरून ग्रामस्थांना आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
काजळा-पानखेडा ही दोन गावे अंबड- बदनापूर या मतदारसंघात येतात. आमदार नारायण कुचे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या रस्त्यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली.लोकप्रतिनधी, अधिकारी, मुख्यमंत्री यांना निवेदन दिली. परंतु या रस्त्याची सरहद्द अंबड की बदनापूर तालुक्याची या पेचामुळे २० वर्षापासून या रस्त्याचे काम झालेले नाही. या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, अनेकवेळा अपघात घडले आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर रुग्णांना रुग्णालयात नेताना मोठ्या यातना सहन कराव्या लागतात. आतापर्यंत अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. काजळा-पानखेडा हा 4 किलोमीटर रास्ता कधी एकदा दुरूस्त होतो याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.