एमएचटी-सीईटी 2025 पीसीएम ग्रुपची 5 मे रोजी फेर परिक्षा

जालना/प्रतिनिधी,दि.2
शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत घेण्यात आलेली एमएचटी-सीईटी 2025 सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक 9 ते 27 एप्रिल, 2025 या कालावधीत पार पाडली आहे. सदर परिक्षेदरम्यान दिनांक 27 एप्रिल, 2025 रोजी सकाळच्या सत्रात झालेल्या परिक्षेमध्ये उमेदवारांना गणित विषयाशी संबधीत तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे उमेदवारांनी सीईटी सेलकडे ई-मेल, पत्र, टिकीट सिस्टम, दुरध्वनी आणि प्रत्यक्ष सीईटीकक्षास भेट देवुन पालक/उमेदवारांनी आक्षेप/तक्रारी नोंदविल्या आहेत. उमेदवार/पालक यांच्या तक्रारीची दखल घेवून तसेच उमेदवारांच्या शैक्षणिक हित लक्षात घेता सीईटीसेल कडून पुढील निर्णय घेण्यात आला आहे.
दि. 27 एप्रिल, 2025 रोजी सकाळच्या सत्रात घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्याप्रमाणे दि. 27 एप्रिल, 2025 रोजी सकाळच्या सत्रात परीक्षा दिलेली आहे, अशा परिक्षेकरिता उपस्थित सर्व उमेदवारांची फेरपरिक्षा दि. 5 मे, 2025 रोजी घेण्यात येणार आहे. याची संबंधीत उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी. सदर परिक्षेस उपस्थित राहीलेल्या उमेदवारांची यादी सीईटीसेलच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. या यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी फेरपरिक्षा देणे अनिवार्य आहे. सदर फेर परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.
उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी राज्य सीईटीकक्षाच्या संकेतस्थळ www.mahacet.org वर नियमीतपणे भेट द्यावी. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.