अमित शहा 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

छ संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.10
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे दौर वाढले असून, दिल्लीतील नेत्यांचे देखील राज्यात सतत दौरे होतांना दिसत आहे. दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शहा हे 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती स्थानिक भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे. या बाबत शहा यांचा दौरा देखील आल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर, या दौऱ्यात अमित शहा हे मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. सोबतच त्यांची सभा घेण्याची देखील नियोजन भाजपकडून सुरु असल्याची माहिती भाजप नेत्यांकडून माध्यमांना देण्यात आली आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्रामचं यंदा अमृत महोत्सवी वर्ष असल्याने यानिमित्ताने प्रशासनाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे याच कार्यक्रमात अमित शाह हजेरी लावणार आहे. 16 सप्टेंबर रोजी अमित शहा छत्रपती संभाजीनगर मध्ये येणार आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप नेत्यांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अमित शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपकडून शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केली जाण्याची शक्यता आहे.
राजकीय चर्चा तर होणारच?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, अमित शहा यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा होत असल्याने यावरूनही राजकीय चर्चा पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर लोकसभा लढवण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत आहे. तर काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी देखील जाहीरपणे भाजप या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अमित शहा यांच्या दौरा म्हणजेच भाजपच्या लोकसभा निवडणुकीची तयारी असल्याची चर्चा आहे. संपूर्ण मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरात.मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आले आहेत. त्यामुळे या बैठकीत मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यातील सर्वच मंत्री उपस्थित राहणार आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता आहे. तर, प्रशासनाकडून देखील या बैठकीच्या अनुषंगाने जोरदार तयारी करण्यात येत आहे.