जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाला उत्साहात सुरुवात

जालना/प्रतिनिधी,दि.06
महिला व बाल विकास विभागामार्फत बालगृहातील बालकांसाठी दरवर्षी तीन दिवसीय चाचा नेहरु बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना यांच्यामार्फत दि.6 ते 8जानेवारी 2025 या कालावधीत चाचा नेहरु बालमहोत्सव पोलिस मैदान, जालना येथे आयोजित करण्यात आला असून बाल महोत्सवाचे उद्घाटन दि.06 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा क्रीडा प्रबोधिनीचे निवासी व्यवस्थापक श्री. खरात, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांची उपस्थिती होती.
बाल न्याय मंडळ सदस्य, जालना, निरीक्षणगृह, बालगृहांचे अधिक्षक, शाळांचे शिक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. या बाल महोत्सवादरम्यान विविध क्रीडा स्पर्धा गोळा फेक, थाळी फेक, 100 मीटर धावणे, लिंबु चमचा, पोत्याची रेस घेण्यात आल्या. दि.7 जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, कॅरम, बुध्दीबळ स्पर्धा घेण्यात येणार असुन दि. 8 जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.