कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम मोहीमे मध्ये जालना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय राज्यामध्ये द्वितीय

जालना/प्रतिनिधी,दि.23
शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून योजनांचा लाभ उपलब्ध करून देत शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम राज्यस्तरावर राबविण्यात आली. या मोहिमेतील दूसऱ्या टप्प्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांनी कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे अंतर्गत राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
राज्य शासनामार्फत प्रशासकीय कामकाजात गतीशिलता, पारदर्शकता आणि लोकाभिमुख सेवांचे वितरण यासाठी ‘100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम’ राबविण्यात आला होता. यामध्ये कार्यालयीन कामकाजात नवकल्पना व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विहित वेळेत सेवा वितरण, ई-ऑफिसची अंमलबजावणी,
डिजिटलायझेशन व कागद विरहित कार्यालयीन कामकाज, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण, कार्यसंस्कृती सुधारणा अंतर्गत प्रशिक्षण अशा विविध बाबींच्या अनुषंगाने मूल्यमापन करण्यात आले. या बाबींमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांनी उत्तम कामगिरी केली.
या उपक्रमासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी मर्यादित वेळेत विशेष काम करुन हे यश संपादन केल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी सांगितले.