अखंड हरिनाम सप्ताह निमित्त अवघी दुमदुमली जामखेड नगरी

अंबड/अनिल भालेकर,दि.10
अंबड तालुक्यातील श्री जांबुवंत महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणून जामखेड ग्राम सर्वत्र ओळखले जाते. धार्मिक,वारकरी संप्रदायाची शिकवण,जोपासना व आचरण जामखेड मधील ग्रामस्थ सातत्याने आग्रहाने करत असतात. याच उद्देशाने जामखेड येथील धनगर गल्लीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले. धनगर गल्लीतील अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षाची परंपरा ग्रामस्थांनी मोठ्या भक्ती भावाने, एकोप्याने व शिस्तबद्धपणे जोपासली आहे.
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा संगीत तुलसी रामचरित्र मानस कथा श्रवण करण्यासाठी महिला,ग्रामस्थ, बालके सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासूनच सक्रिय सहभागी होत असे.
दिनांक 9 मे रोजी या सप्ताहाच्या समाप्ती प्रसंगी ग्रंथ दिंडी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी महिलांनी संपूर्ण दिंडी मार्गावर सडा टाकून आकर्षक रांगोळी रेखाटली होती.पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेत, भगवे फटाके हाती घेत, ग्रामस्थ महिला आबालवृद्ध मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.
टाळ मृदंगाच्या निनादात, विठुरायाच्या नामस्मरणात, हरिपाठ पावली,फुगडी खेळत ग्रामस्थ देहभान विसरून हरिनामा मध्ये तल्लीन झालेले दिसून आले. याप्रसंगी उपस्थित असणाऱ्यांना स्वर्गसुखाची अनुभूती प्राप्त झाली.
ह भ प बाळकृष्ण सुडके यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली. सप्ताह समितीने उत्कृष्ट नियोजन करत शिस्तबद्धपणे हा अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी केल्याबद्दल समितीच्या सर्व कर्तुत्वान सदस्यांचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक अभिनंदन व आभार व्यक्त केले जात आहे.