गुरुकुंजात ग्रामजयंती महोत्सव:शेतकरी ग्रामनाथांचा सन्मान, ग्रामस्वच्छता अभियान, लाखो दीपांनी उजळला परिसर

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि 1
आपल्या खंजिरीच्या माध्यमातून अखिल विश्वाला मानवतेसह सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती महोत्सवाचा हृदयस्पर्शी सोहळा त्यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंजनगरी मोझरी येथील महासमाधी परिसरात बुधवारी ३० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता ब्रह्ममुहूर्तावर गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यानाने साजरा करण्यात आला. ग्रामजयंतीच्या शुभ पर्वावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुज नगरीत गावकऱ्यांनी पहाटे ग्रामस्वच्छता केली. दरम्यान, तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी परिसर लाखो दीपांनी उजळण्यात आला होता.गुरुकुजातील तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीत पहाटे ५ वाजता सामुदायिक ध्यानाने या ग्रामजयंती महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. एक तास तुकडोजी महाराजांची भजने. तुकडोजी महाराजांच्या जन्मोत्सवावेळी असलेली परिस्थिती मांडण्यात आली. त्यानंतर सामुदायिक ध्यान व महाआरती पार पडली. या वेळी उपसर्वाधिकारी दामोदर पाटील यांनी सामुदायिक ध्यानानंतर चिंतन व्यक्त केले. गेल्या दीड महिन्यापासून श्री गुरुदेव महिला मंडळाच्या वतीने महासमाधी स्थळी, ग्रामगीता पठण हा दैनिक कार्यक्रम झाला असून तीन दिवसांपासून गुरुकुजातील महासमाधी परिसर येथे हा ग्रामजयंती महोत्सव सुरू आहे. सायंकाळी गोपाल सालोडे यांच्या वाणीतून राष्ट्रसंतांचा भजन संदेश प्रस्तुत करण्यात आला. राष्ट्रवंदनेने आयोजित कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.शिस्तबद्ध शोभायात्रेने दुमदुमला परिसर भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात तीन दिवसीय ग्रामजयंती महोत्सवांतर्गत गुरुकुंजातून शोभायात्रा काढण्यात आली. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हे भजनाचे स्वर या शिस्तबद्ध शोभायात्रेकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच, त्यामुळे परिसरातील वातावरणही पवित्र झाले होते. नारायनदास पडोळे यांच्या गोपाल काला कीर्तन व महाप्रसादाने आयोजित ग्रामजयंती महोत्सवाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण दळवी, उद्धव वानखडे व सहभागी महिला मंडळ व भाविकांनी अथक परिश्रम घेतले. हा ग्रामजयंती महोत्सवाचा हृदयस्पर्शी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शेतकऱ्यांचा सन्मान हीच खरी ग्रामजयंती : लक्ष्मण गभे तीन दिवसीय आयोजित कार्यक्रमांतर्गत उन्ह, वारा, पावसाची तमा न बाळगता शेतात तिफन घेऊन राब -राब राबणारे शेतकरी सुरेंद्र भिवगडे सरपंच मोझरी, विशाल शेळके, प्रमोद पांडे यांच्यासह पाच ग्रामनाथ शेतकऱ्यांना अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवांमडळच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी ग्रामनाथ हा समाजाच्या शेवटच्या घटकाच्या पोटात अन्न पोहोचावे म्हणून अपार कष्ट घेत असतो. म्हणून कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांचा सन्मान हीच खरी ग्रामजयंती असल्याचे मत सर्वाधिकारी लक्ष्मण गमे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी उपस्थित सरचिटणीस जनार्दनपंथ बोथे, दामोदर पाटील, पुष्पां बोंडे, लक्ष्मण काळे, प्रकाश वाघ, माजी जि.प. सदस्य संजय देशमुख,विलास साबळें, गुलाब खवसे,अॅड. दिलीप कोहळे, यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होती.