pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत 2 नोव्हेंबर रोजी जालना येथे शिबिराचे आयोजन

0 1 2 1 1 2

जालना/प्रतिनिधी,दि. 26

मराठा समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत 21 ऑक्टोबर 2023 रोजी  मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

मराठवाड्यात जिल्हानिहाय जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक जिल्ह्यात कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची सर्व माहिती नागरिकांना देणे. लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे, योजनेची विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. जालना येथे दि. 2 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिबिराच्या आयोजनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

सारथी संस्थेमार्फत घेण्यात येणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे – सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी चर्चासत्र आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीस सन 2023-24 या वर्षात मराठा, कुणबी  व कुणबी मराठा अशा एकूण 20 हजार उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रमाची मागणी नोंदणीचा अर्ज विद्यार्थ्यांकडून भरून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज भरून सारथी संस्थेचे माहितीपत्रक वाटप करण्यासोबत एमकेसीएल मार्फत प्रशिक्षण घेत असलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत या कार्यक्रमात ऐकवले जाणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन  सत्र आयोजन, शिबिराच्या ठिकाणी सारथी संस्थेचे यशस्वी विद्यार्थ्याचे बॅनर तयार करून लावल्यास भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना सारथी संस्थेचे योगदान कळेल तसेच सारथीचे कोचिंग घेण्यास प्रेरणा मिळणार आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत घेण्यात येणारे कार्यक्रम पुढीप्रमाणे –

मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुकानिहाय प्रत्येक ग्रामपंचायतींपर्यंत योजनेची माहिती देण्यात येणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करून त्याच ठिकाणी महामंडळाचे नोंदणी करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्वरित व्याज परतावा देण्यासंदर्भात कार्यवाही सुरु करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्व विभागात प्रचार प्रसिध्दीसाठी समाज माध्यमवरुन, रेडिओ एफएम आणि एस. टी. महामंडळाच्या बसेस, बस स्थानक या महत्त्वाच्या ठिकाणी होर्डिंग्जच्या माध्यमातून समाजापर्यंत योजनेची माहिती देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मेळाव्याच्या ठिकाणी बँकेचे अधिकारी कर्मचारी तसेच काही छोट्या उद्योगाबाबत आणि कृषी अधिकाऱ्यांमार्फत कृषी संबंधी उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती देणारे कर्मचारी  उपस्थित राहून याबाबत माहिती देणार आहेत.

संस्थांच्या विविध योजनांच्या लाभार्थ्याची निवड, व्यवसायातील प्रगती याबाबतची सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ याबाबत नियमित आढावा घेणार आहे.

सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना पात्र लाभार्थ्यांना तात्काळ योजनांचे लाभ मिळवून देण्याबाबतच्या शिबिरांचे आयोजन करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबीरासाठी  जिल्ह्यातील महत्त्वाच्या बँकांचे प्रतिनिधी, विविध व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

सारथी तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती सविस्तरपणे सांगून पात्र लाभार्थ्यापर्यंत या संस्थांच्या योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबत शिबिराचे आयोजन यशस्वीरित्या करण्यासाठी विभागीय आयुक्त यांनी संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त व इतर विभाग प्रमुख यांना आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात. तसेच संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक, सारथी व व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांनी उपस्थित राहून शिबिराचे यशस्वी आयोजन करावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभाग सचिव सुमंत भांगे यांनी केले आहे.

पहिला टप्पा जिल्हा निहाय कार्यक्रम पुढील प्रमाणे –

बीड जिल्ह्यात 1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बीड, छत्रपती संभाजीनगर येथे 2 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर, जालना येथे 2 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना, लातूर येथे 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11वाजता जिल्हाधिकारी कार्यालय लातूर, धाराशिव येथे ४ नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे सकाळी 11 वाजता , परभणी येथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, हिंगोली येथे 8 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली, नांदेड येथे 9 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या जिल्ह्यांमध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.