शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच पिकांना खतांची मात्रा द्यावी
जालना/प्रतिनिधी,दि.26
जमीनेचे आरोग्य शाश्वत स्वरुपात जतन करण्याकरीता शेतकरी बांधवानी माती परीक्षण करूनच आवश्यकतेनुसार पिकांना खतांची मात्रा दयावी व अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे, यांनी केले आहे.
पिक उत्पादनामध्ये सहभागी असणाऱ्या घटकामध्ये जमीन हा एक अत्यंत महत्वाचा नैसर्गिक घटक आहे. जमिनीची सुपीकता व उत्पादकता या दोन्ही बाबी पिक उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरतात तथापि अलीकडील कालावधीत मात्र शेती व्यवसायातून महत्तम उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खताचा अवाजवी व असंतुलित वापर, जमीन सतत पिकाखाली राहणे, पाण्याचा आयोग्य वापर इत्यादीमुळे, जमिनीची आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळे पिकाची खुरटलेली वाढ, उत्पादनाच्या गुणामध्ये घट, जमीन नापीक होणे, समस्याग्रस्त क्षेत्रामध्ये वाढ, उत्पादन क्षमतेमध्ये घट आदि बाबी निदर्शनास येत आहे.
आजमितीस व्यापारी तत्वावरील शेती करणे अपरिहार्य आहे. यासाठी शेती नियोजनमध्ये जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मृद व पाणी परीक्षणावर आधारित सुयोग्य व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. माती परीक्षणामुळे शेत जमिनीचा प्रकार, तिचे भौतिक, रासायनिक, कायिक गुणधर्म, अन्नद्रव्याची उपलब्धता यानुसार जमिनीमध्ये हवा, पाणी यातील समतोल राखणे, क्षारता, चोपण, घट्टपणा इ. दोष दूर करणे, जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्य तसेच पिकास आवश्यक अन्नद्रव्य मात्रा याआधारे आवश्यक खत मात्राचा अवलंब करणे शक्य होते. त्यामुळे जमीनेचे आरोग्य शाश्वत स्वरुपात जतन करण्याकरिता सर्व शेतकरी बांधवानी माती परीक्षण करूनच आवश्यकतेनुसार पिंकाना खतांची मात्रा दयावी व अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कापसे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.