शासकीय निवासी शाळेतील प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.10
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जालना जिल्ह्यात मुला-मुलींसाठी 3 शासकीय निवासी शाळा कार्यान्वीत असून या शाळांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग यांच्याकरिता प्रवर्गनिहाय जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शासकीय निवासी शाळेतील रिक्त जागेवर गुणवत्तेनुसार व पात्रतेनुसार प्रवेश दिला जातो. या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश अर्जाचा नमुना संबंधित शाळांमध्ये विनामुल्य उपलब्ध आहे. शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी, विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आर्थिक परिस्थितीमुळे अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध मुला-मुलींना उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेता येत नाही, अशा मुला- मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक तालुक्यात एक शासकीय निवासी शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मंजुर 100 निवासी शाळांपैकी जालना जिल्ह्यात जालना येथे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलींची शासकीय निवासी शाळा, बदनापुर येथे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलांची शासकीय निवासी शाळा आणि भोकरदन येथील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलांची शासकीय निवासी शाळा अशा एकुण 03 शासकीय निवासी शाळा कार्यान्वीत आहेत. शाळेमध्ये प्रत्येकी 200 मुले-मुली शिक्षण घेत असून शाळेमध्ये इयत्ता सहावीपासून प्रवेश देण्यात येतो. शासकीय निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास व्यवस्था, भोजन, शैक्षणिक साहित्य व इतर सोयी-सुविधा पुरविल्या जातात. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.