क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी वेळेत वितरीत करावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई/प्रतिनिधी,दि.26
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी लाभार्थींना निर्धारित वेळेत वितरीत करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
मंत्रालय दालन येथे आढावा बैठकीत मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, सहसचिव श्री.अहिरे, उपसचिव वि.रा.ठाकूर, सहसचिव स्मिता निवतकर, महिला व बालविकास आयुक्तालयाचे उपायुक्त राहुल मोरे उपस्थित होते.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही शून्य ते १८ वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या मुला-मुलींना संस्थाबाह्य कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे त्यांना मुलभूत सुविधा मिळाव्यात व त्यांचा विकास व्हावा यासाठी राबविण्यात येते. प्रतिलाभार्थी व संस्थांना देण्यात येणारा निधी वेळेत वितरीत करावे तसेच आगामी कालावधीकरिता निधीची मागणी वेळेत सादर करावी, असे आदेश मंत्री कु. तटकरे यांनी दिले.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, ईरशाळवाडी या दरडग्रस्त आपत्तीतील बाधित अनाथ मुलांना आवश्यक ती सर्व मदत व सहाय्य विभागाकडून करावी. अंगणवाडी केंद्रात जाणारी बालके, शाळेत जाणारी बालके, शून्य ते १८ वयोगटातील मुलांची स्थिती तपासून विभागाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी. यामध्ये पात्र लाभार्थींना बालसंगोपन योजनेचा लाभदेखील वेळेत वितरीत करावा. दुर्घटनेतील बालकांना आवश्यकता पाहून वेळोवेळी समपुदेशन देखील करण्यात यावे. महिला व बाल विकास विभागातंर्गत विविध समित्यांची स्थापना करून याचा नियमित कामकाज आढावा घेण्याचे निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी दिले.