जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करावेत

जालना/प्रतिनिधी,दि.7
जिल्ह्यातील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्याक्रमाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तरी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता समितीकडे अर्ज सादर केलेले नाहीत त्यांनी ज्या जिल्ह्यातील जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे. त्या संबंधित जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी केले आहे.
मागासवर्ग प्रवर्गातील अकरावी व बारावीमध्ये विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थी समितीकडे वेळेत अर्ज सादर करीत नाही. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक तसेच इतर लाभापासून वंचित राहतात. जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरीता समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी विहीत वेळेत समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना या समितीतर्फे मंडणगड पॅटर्नच्या धर्तीवर राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रस्ताव सादर केलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. त्याची एक प्रत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावी. असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.