जिल्ह्यात 20 सप्टेंबरला आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन
जालना/प्रतिनिधी,दि.19
जिल्ह्यातील एकुण 28 महाविद्यालयामध्ये दि.20 सप्टेंबर 2024 रोजी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑनलाईन उदघाटन होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी जवळच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनस्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
राज्यातील युवक व युवतींसाठी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यातीत अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना आजपर्यंत विविध क्षेत्रात रोजगार प्राप्त झालेला आहे. प्रशिक्षणानंतर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी व स्वयंरोजगाच्या संधी उपलब्ध होत आहेत. या दृष्टीकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजने अंतर्गत राज्यातील 1010 नामांकित महाविद्यालयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची” स्थापना करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील 28 महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या या केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 20 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता ऑनलाईन उद्घाटन होणार आहे.
जालना जिल्ह्यातील मॉडेल कॉलेज घनसावंगी, अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना, लाल बहादूर शात्री वरिष्ठ महाविद्यालय परतूर, स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय मंठा, राष्ट्रमाता इंदिरा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जालना, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बदनापूर, रावसाहेब पाटील दानवे कॉलेज ऑफ फार्मसी बदनापूर, ओजस कॉलेज ऑफ फार्मसी जालना, राजर्षी शाहू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पारध, लोकमान्य टिळक सीनियर कॉलेज सेवली, चैतन्य नर्सिंग स्कूल बदनापूर, श्री. रमेश भाऊ शेंडगे महाविद्यालय इंदेवाडी, ज्ञानसागर वरिष्ठ महाविद्यालय जाफ्राबाद, भानुदासराव चव्हाण महाविद्यालय परतूर, पार्थ कला व विज्ञान महाविद्यालय नेर, गुरु गंगाभारती महाविद्यालय परतूर, जिजाऊ कला व विज्ञान महाविद्यालय वरुड (बु.), देवकी महाविद्यालय पिरपिंपळगाव, श्री रंगनाथ महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नाव्हा, ज्ञानसागर कनिष्ठ महाविद्यालय सिपोरा (आ.), रोकडेश्वर संस्कार विद्यालय विरुद्ध कनिष्ट महाविद्यालय उज्जैनपुरी, जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिरकल्याण, नवोदय पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चणेगाव, न्यू पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इंदलकरवाडी, गिरजा पूर्णा हायस्कूल व ज्यु. कॉलेज वालसा (खा.), मोरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर, संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हसनाबाद, कै. दशरथ बाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जवखेडा (खु) या 28 महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा उमेदवारांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांच्याशी (02482-299033) संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.