केमिकलयुक्त धुरामुळे मत्स्यशेतीचा फटका; शेतकऱ्यांचा संताप, नुकसानभरपाईची मागणी.

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.7
बदनापूर (जालना) – बदनापूर तालुक्यातील कंडारी गावात सिमेंट कारखान्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे शेततळ्यातील माशांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यामुळे मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
कंडारी गावातील शेतकरी किशोर कोल्हे यांनी आपल्या शेतातील एक एकर जागेत मत्स्यपालन प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र गावालगत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी एका ठेकेदाराने सिमेंट व खडी मिक्स करण्याचा कारखाना उभारला आहे. या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर सिमेंटची धूळ आणि केमिकलयुक्त धूर निघत आहे. यामुळे आसपासच्या शेतीसह शेततळ्यातील मासेही मृत्युमुखी पडले.
“कारखाना सुरू करण्यापूर्वी आमच्या कोणत्याही परवानगीशिवाय काम सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच आम्ही याला विरोध करत होतो. मात्र आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने कारखाना सुरू केला. या विषारी धुरामुळे केवळ मासेच नव्हे, तर शेती पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. यामुळे आमचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे,” असे मत्स्यपालक किशोर कोल्हे यांनी सांगितले.
या प्रकरणाची दखल घेत कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, संबंधित ठेकेदार व कंपनीवर कठोर कारवाई करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पर्यावरण व शेतकऱ्यांच्या हक्कांचे उल्लंघन
या घटनेमुळे पर्यावरणाच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. कोणतीही पूर्वसूचना किंवा परवानगी न घेता अशा प्रकारचे औद्योगिक प्रकल्प उभारणे कायद्याच्या विरोधात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आरोग्य, उत्पन्न आणि पर्यावरण यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडूनही होत आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
या प्रकरणात आता जिल्हाधिकारी आणि पर्यावरण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढून दोषींवर कठोर कारवाई झाली तरच भविष्यात अशा घटना टाळता येतील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
———————————————————
केमिकलयुक्त धुरामुळे मत्स्यशेती उद्ध्वस्त; शेतकऱ्याची नुकसानभरपाईसाठी धाव
या कारखान्याच्या धुरामुळे माझ्या शेततळ्यातील मासेमारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.माझी व शेतकऱ्याची न्यायासाठी धडपड चालू आहे . आमचे प्रतिनिधी जितेंद्र गाडेकर यांच्याशी बोलताना किशोर कोल्हे यांनी सांगितले की केमिकलयुक्त धुरामुळे मत्स्यशेती उद्ध्वस्त झाली असून, या घटनेमुळे मी व परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलो आहे. संबंधित कारखान्यावर कारवाई करत मला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी किशोर कोल्हे यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत निवेदन दिले असले तरी प्रशासन गप्प असल्याचेही त्यांनी नमूद केले.
किशोर कोल्हे
मत्स्यशेती व्यावसायिक कंडारी