यथार्थ ज्ञानप्राप्ती साठी ज्ञानेश्वरी नित्य अभ्यासावी- डॉ प्रमोद कुमावत

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.2
ज्ञानेश्वरी ग्रंथ हा केवळ भगवतगीतेचे भाषांतर नसून संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले ब्रह्म विद्येचे प्रकटीकरण आहे. भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली त्यात ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक दृष्टांतांनी ते तत्त्वज्ञान उलगडले आहे. मराठी भाषेमध्ये ब्रह्मज्ञानाचा सुकाळ केला आहे म्हणून सुखप्राप्ती साठी प्रत्येक मनुष्याने हा ग्रंथ नित्य अभ्यासावा असे प्रतिपादन डॉ प्रमोद कुमावत यांनी केले.
साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त पाथरवाला खु. येथे साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दि. 30 सप्टेंबर रोजी “आनंदी जीवन” याविषयावर संत साहित्याचे अभ्यासक डॉ विजयकुमार फड यांचे प्रवचन संपन्न झाले तर 1 ऑक्टोबर रोजी डॉ प्रमोद कुमावत यांची प्रवचन सेवा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्वांना सुखाची इच्छा आहे परंतु सुखाची जागा विसरले आहेत. सुख हे आपल्या अंतकरणात आहे मात्र आपण तिथे न शोधता सुख हे बाहेर विषयांमध्ये संसारामध्ये वस्तूंमध्ये शोधत असतो आणि पर्यायाने दुःखच पदरी पडत असते. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मनाला प्रसन्न करून आपण ब्रह्मप्राप्ती करून घेतली असता सुख प्राप्त होत असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी अवधान येकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे,हे प्रतिज्ञोत्तर माझे, उघड ऐका, माऊली म्हणतात मी जे सांगत आहे ज्ञानेश्वरी मध्ये ते आपण लक्षपूर्वक ऐकले तरी तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा ग्रंथ सर्वांनी नित्य अभ्यासामध्ये ठेवला पाहिजे. माऊली म्हणतात, आणि ग्रंथोपजीवी विशेषशी लोकी ये दृष्ट्या दृष्ट विजय व्हावे जी, अर्थात ज्या व्यक्तींनी हा ग्रंथ आपला उपजीव्यभूत केला आहे म्हणजे रोज तो अभ्यासतो आहे त्याचा यह लोकांमध्ये तर विजय होणारच आहे परंतु देह ठेवल्यानंतर परत लोकातही त्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी साईबाबा मंदिर ट्रस्टचे सर्व विश्वस्त मंडळ, शंभू राजे दुर्गा मंडळचे सर्व पदाधिकारी, अवतार मेहेरबाबा आध्यात्मिक केंद्रातील सर्व मंडळ उपस्थित होते.



