मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात तब्बल 1 लक्ष 29 हजार 924 प्रमाणपत्रे वितरीत

जालना/प्रतिनिधी,दि. 24
जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दि. 1 जुलै ते 22 जुलै 2024 या कालावधीत एकूण 78067 उत्पन्न प्रमाणपत्रे आणि 51857 वय, अधिवास व राष्ट्रीयता प्रमाणपत्र असे एकुण 1 लाख 29 हजार 924 प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी आपले सरकार सेवा केंद्राच्या तीन बैठका घेतल्या असून यामध्ये योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, आणि योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना, तसेच केंद्रावर आलेल्या नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन व ऑनलाईन अर्ज करण्यास मदत करण्याचे निर्देश देण्यात आले. या योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक मुलींना शैक्षणिक व सामाजिक लाभ होईल. तसेच शासनाच्या या उपक्रमामुळे मुलींच्या शिक्षणाला व आत्मनिर्भरतेला चालना मिळणार आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, सर्व तहसीलदार व अन्य अधिकारी वर्ग यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक मुलींनी व त्यांच्या कुटुंबियांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.