जनावरांची अवैध वाहतूक करणारी सहा वाहने जप्त वाहनचालकांवर गुन्हे दाखल अंबाडा येथे कारवाई

मोर्शी/प्रतिनिधि,दि.03
मोर्शी : मोर्शी शहरातून जनावरांना अवैधरीत्या कत्तलीसाठी घेऊन जाणारी सहा वाहने रविवारी शहरात गोरक्षकांनी पकडली. मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या मोर्शी तालुक्यातून होणारी गोवंशाची अवैध वाहतूक यात काही नाविन्य राहिले नाही. मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथे चार टाटा एस तसेच पाळा येथून दोन टाटा एस वाहने अशी एकूण सहा वाहने गोवंश घेऊन जाताना आढळल्याने गोरक्षकांनी वाहने अडवून विचारपूस करत वाहनांसह जनावरे मोर्शी पोलिसांच्या ताब्यात दिली.
जप्त केलेल्या वाहनातून एकूण १६ गोवंश मोर्शी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची रवानगी गोरक्षणमध्ये केली. सर्व वाहन चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. गोवंशाच्या अवैध तस्करीदरम्यान फक्त वाहन चालकावर कारवाई न करता त्या जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी गोरक्षकांद्वारे होत आहे.