लोकसभा उमेदवारांनी स्ट्राँगरुम उघडतेवेळी उपस्थित रहावे -जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पांचाळ
* मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज * मतमोजणी प्रतिनिधीं ओळखपत्रासाठी अर्ज करावेत

जालना/प्रतिनिधी,दि.24
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर जालना लोकसभा मतदार संघात सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पुर्ण करण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष मतमोजणी मंगळवार दि.4 जुन 2024 रोजी सकाळी 8 वाजता मे सरस्वती ऑटो कम्पोनंट प्रायव्हेट लिमिटेड जालना येथे होणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी स्ट्राँगरुम उघडतेवेळी मे सरस्वती ऑटो कम्पोनंट प्रायव्हेट लिमिटेड जालना या मतमोजणीच्या स्थळी सकाळी 7 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर मतमोजणी पुर्व तयारी बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, लोकसभा मतदार संघातील मतमोजणी दि.4 जुन रोजी होणार असून सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेटची तर सकाळी 8.30 वाजेपासून ईव्हीएमवरील मतमोजणीला सुरुवात होईल. लोकसभा निवडणूकीत एकुण 26 उमेदवार होते तर एक नोटा बटन असे मिळून एकुण 6 विधानसभा मतदारसंघासाठी 94 टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे. तर पोस्टल बॅलेटसाठी एकुण 11 टेबल असणार आहेत. मतमोजणीचा हॉल एकच राहणार असून बॅरिकेटस लावून प्रवेशद्वार वेगवेगळे राहील. तसेच कोणत्या टेबलवर कोणता कर्मचारी राहील याचे नियोजन सरमिसळ पध्दतीने निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार निवडणूक निरीक्षक त्याच दिवशी सकाळी करत असतात. असेही सांगितले. मतमोजणीच्या ठिकाणी वाहन, मोबाईल, डिजीटल उपकरणांना परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी मतमोजणी प्रतिनिधींचे ओळखपत्र तयार करण्यासाठी छायाचित्र व आधारकार्डच्या छायांकित प्रतीसह अर्ज भरुन सादर करावेत. अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली.
पुर्णपणे दक्षता घेवून नियोजन करण्यात आले आहे. स्ट्राँगरुमच्या सुरक्षेसाठी डबल लॉक सिस्टीम व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. असे सांगून स्ट्राँगरुमच्या सुरक्षाव्यवस्थेसह सीसीटीव्ही फुटेजची काही दृश्यही त्यांनी संगणकाद्वारे उपस्थितांना दाखवत माहिती दिली. तसेच उमेदवार प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे, शंकेचे समाधानही त्यांनी यावेळी केले.