प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथे वेळेवर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना होतो त्रास.
शासकीय अधिकाऱ्यांचा कर्तव्यात निष्काळजीपणा. शासकीय आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची जनतेची मागणी. माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड उठविणार आवाज.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30
रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्याच्या पूर्व विभागासाठी असलेले कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याकारणाने सामान्य आणि गरीब गरजू रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आत्ताच मागील काही दिवसांपूर्वी म्हणजे २५ मे आणि २६ मे २०२५ रोजी सलग दोन दिवस सदर आरोग्य केंद्रात संध्याकाळी सात ते आठ या दरम्यान रुग्ण संजय अर्जुन जोशी आणि रमाकांत पाटील गेले असता येथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. तसेच याच दरम्यान एक साप चावलेला रुग्णही आला होता. त्यालाही तत्काळ तालुक्याच्या रुग्णालयात नेण्यात आले. कारण कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नव्हते. या सर्वांचा पाठपुरावा सामाजिक कार्यकर्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड यांनी २७ मे २०२५ रोजी घेतला असता त्यांच्या असे निदर्शनात आले की सदर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर वेळेत उपस्थित ड्युटी बजावत नाहीत. जे प्राथमिक आरोग्य केंद्र गरीब गरजू आणि सामान्य माणसांच्या सेवा बजावण्यासाठी आहे इथे येणारा प्रत्येक रुग्ण गरीब कुटुंबातून, दुर्गम वाडी वस्तीवरील असतो. त्यावेळीस या रुग्णांना वेळेत सेवा उपलब्ध होत नाहीत. २७ मे ला संध्याकाळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी व्हिजिट केली असता कोणताही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते हेही निदर्शनास आले. यासंदर्भात चौकशी केली असता असे दिसून आले की, ग्रामसेवक खैरे यांना जीवन गावंड यांनी विचारले असता त्यांनीही योग्य तो प्रतिसाद दिला नाही. आणि ग्रामसेवकानेही कोणतीही शहानिशा न करता सदर डॉक्टर कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील एका घरात राहत असल्याचे सांगितले. आणि त्या संदर्भात मंजुरी ही दिली. पण प्रत्यक्ष रात्रपाळीसाठी आलेल्या महिला डॉक्टर कविता भगत यांच्यासोबत जीवन गावंड यांनी चर्चा केली असता असेही जाणवले की वेळापत्रनुसार डॉक्टरची उपस्थिती सदर रुग्णालयात दिसत नाही. डॉक्टरांचे वेळापत्रक मागितल्यावर ही वेळापत्रक देण्यास टाळाटाळ केली. तसेच रात्रपाळीत असणारे डॉक्टर ही बाहेरगावाहून येत आहेत. यामुळे येथे रुग्णालयात वेळेत वैद्यकीय सुविधाही उपलब्ध होत नाहीत . या सर्वांमुळे सामान्य गरीब गरजू कुटुंबातील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि जबरदस्तीने तालुक्याच्या ठिकाणी वा इतर प्रायव्हेट रुग्णालयात जास्तचे पैसे खर्च करावे लागत आहेत. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड असेही म्हणाले की या संदर्भात शासनाचे लक्ष याकडे वेधण्यासाठी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देणार आहेत. बहिऱ्या झालेल्या या वैद्यकीय व्यवस्थेविरोधात पायी दिंडी काढणार आहेत. असे जाहीर सांगितले. जेणेकरून प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथील आरोग्य सुविधा सर्वांसाठी सुरळीतपणे चोवीस तास उपलब्ध होतील.कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात जर एखादे डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित नसतील आणि एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण असा थेट सवाल आताच उपस्थित होत आहे.