गौरव म्हात्रे गोल्डन अवर हिरो पुरस्काराने सन्मानित

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27
उरण शहरातील रेल्वे स्थानकासमोर शनिवारी दि.६ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११ वाजता क्रेटा चारचाकी चालकाने भरधाव वेगात स्कुटरला धडक दिल्याने पती, पत्नीचा मृत्यू तर तीन वर्षांची चिमुरडी जबर जखमी होण्याची दुर्दैवी घटना घडली होती. या गंभीर अपघातात तीन वर्षाच्या जखमी चिमुरडीला उरण नागाव म्हातवली येथील सामाजिक कार्यकर्ते गौरव म्हात्रे यांनी जखमी मुलीला त्वरित उपचार मिळावे,तिचे प्राण वाचावेत या दृष्टिकोनातून त्या तीन वर्षाच्या जखमी चिमुरडीला बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटल मध्ये भरती केले. त्वरित हॉस्पिटल मध्ये भरती केल्याने ३ वर्षाच्या गंभीर जखमी चिमुरडीवर त्वरित उपचार सुरु झाले. व तीचे प्राण वाचले. गौरव म्हात्रे यांच्या सारख्या प्रसंगावधानी, तत्पर सामाजिक कार्यकर्त्यामुळे त्यांनी दाखविलेल्या धाडसी कार्यामुळेच तीचे प्राण वाचले आहेत. गौरव म्हात्रे यांनी दाखविलेल्या या माणुसकीच्या कार्याची दखल घेत अपोलो हॉस्पिटल तर्फे वर्ल्ड एमेरजेन्सी डे (जागतिक आपत्कालीन दिवस )चे औचित्य साधून वार्षिक अवॉर्ड ‘गोल्डन अवर हिरो’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अपोलो हॉस्पिटलचे एमेरजेंसी डिपार्टमेंट हेड डॉ. नितीन जगासिया यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.यावेळी हॉस्पिटल विविध विभागातील डॉक्टर, नर्स, अधिकारी कर्मचारी, तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
उरण नागाव म्हातवली येथील सामाजिक कार्यकर्ते गौरव म्हात्रे यांनी आजपर्यंत अनेक गोर गरिबांना मदतीचा हात दिला आहे. अनेकांच्या सुख दुःखात धावून गेले आहेत.गौरव म्हात्रे यांनी सुरज तांडेल ग्रुप तर्फे अनेक सामाजिक कार्ये सुद्धा केली आहेत.तसेच एका ३ वर्षाच्या गंभीर जखमी असलेल्या मुलीला त्वरित हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्याने तिचे प्राण वाचले. गौरव म्हात्रे यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत अपोलो हॉस्पिटलने त्यांना वर्ल्ड एमेरजेन्सी डे चे औचित्य साधून गोल्डन अवर हिरो पुरस्कार दिल्याने गौरव म्हात्रे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.