18-जालना लोकसभा मतदारसंघ राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

जालना/प्रतिनिधी,दि.11
राजकीय पक्ष व उमेदवारांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. निवडणूक काळामध्ये कुठल्याही प्रलोभनाच्या अवैध वस्तूंची वाहतूक करण्यास आदर्श आचारसंहितेअंतर्गत निर्बंध आहेत. राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह राजकीय पक्षाचे उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, जालना लोकसभा मतदारसंघात दि. 13 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा कालावधी आज संपला असून मतदानापूर्वीचा आणि मतदानाच्या दिवशी आचारसंहिता भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आदर्श आचारसंहितेमध्ये काय करावे काय, करू नये याबाबतची माहितीही सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लोक प्रतिनिधित्व कायदा व भारतीय दंड संहिता यांच्याअंतर्गत निवडणूक संदर्भात होणाऱ्या गुन्ह्यांवर प्रशासन व पोलीस यंत्रणेचे बारकाईने लक्ष आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.