शासनाकडून जर्मनी देशात वाहनचालक होण्याची सुवर्णसंधी
क्युआर कोड स्कॅन करुन अर्ज ऑनलाईन सादर करावेत

जालना/प्रतिनिधी,दि. 23
जर्मनी देशातील बाडेन-बुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्यामध्ये वाहनचालकांचा समावेश असून कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करण्याची जबाबदारी परिवहन विभागाकडे सोपविण्यात आली आहे. तरी राज्य शासनाकडून जर्मनी देशात वाहनचालक म्हणून जाण्याची सुवर्णसंधी वाहनचालकांना उपलब्ध झाली असून इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी क्युआर कोड स्कॅन करुन अर्ज ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनीष दौंड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जर्मनी देशातील बाडेन-बुटेनबर्ग येथे वाहन चालक म्हणुन जाण्यास इच्छूक असणा-या वाहनचालकांनी शासनमार्फत जारी करण्यात आलेल्या क्युआर कोड स्कॅन करुन त्यावरील दिलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबतचा अर्ज भरावा, जारी करण्यात आलेल्या क्युआर कोड स्कॅन करुन अर्ज कसा भरावा याबाबत अधिक माहितीसाठी उमदेवारांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांच्याशी संपर्क करावा. या प्रकल्पाअंतर्गत उमेदवारास जर्मन भाषा येणे अनिवार्य आहे. तथापि, जर्मन भाषा प्रशिक्षणाबाबतची कार्यवाही ही शासनामार्फत करण्यात येणार असून संदर्भाकिंत शासन निर्णयामध्ये दिल्यानुसार उमेदवाराचा सर्व प्रशिक्षणाचा खर्च शासन करणार आहे. जर्मनी व भारत या दोन्ही देशातील वाहन चालकांकरीता असलेले नियम व अभ्यासक्रम तसेच इतर अनुषंगिक यामध्ये फरक असून उमेदवारास आवश्यक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही व खर्च देखील शासनस्तरावरुन करण्यात येईल. उमेदवारांनी क्युआर कोड स्कॅन करुन विचारण्यात आलेली माहिती नोंदवून अर्ज दाखल करावा. तसेच याबाबत कोणी खाजगी व्यक्ती, संस्थाचे पैसे भरुन नोकरी लावण्याचे आमिष दाखवत असले तर अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.