जिल्हा परिषदेत कृषि दिन उत्साहात साजरा
जालना/प्रतिनिधी,दि.2
1 जुलै हा दिवस महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी त्यांनी कृषि क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे कृषि दिन साजरा केला जातो. यावर्षी जिल्हा परिषद कृषि विभाग व राज्य शासन कृषि विभागाच्या वतीने संयुक्तरित्या जिल्हा परिषद जालनाच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये ” कृषि दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जी.आर. कापसे, कृषि विकास अधिकारी व्ही. डी. गायकवाड, मोहिम अधिकारी निलेशकुमार भदाने, नोडल अधिकारी श्रीकांत देशपांडे, कृषि अधिकारी एस.व्ही. कराड, कृषि अधिकारी डी. एस. काकडे, व जिल्ह्यातील कृषिभूषण शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त भगवानराव डोंगरे, रविंद्र गोल्डे, छाया मोरे, सिताबाई मोहिते, सतिश होंडे व कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले शेतकरी उपस्थित होते.
कृषि विज्ञान केंद्र खरपुडी येथील शास्त्रज्ञ राहूल चौधरी यांनी पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापन व कापुस, सोयाबीन पिकांच्या संगोपनाबाबत तसेच पंडीत वासरे यांनी सोयाबीन व इतर पिकाच्या पेरणीसाठी बीबीएफ लिंन्टरचा वापर व त्याचे फायदे तसेच पावसाचा खंड पडल्यानंतर शेतकऱ्यांनी करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जी. आर. कापसे यांनी कै. वसंतरावजी नाईक यांनी कृषि व सिंचन या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची सविस्तर माहिती सभागृहात दिली व शेतकऱ्यांनी कृषि विभाग व शास्त्रज्ञाचा समन्वय ठेवून आधुनिक पध्दतीने शेती व्यवसाय करावा असे सांगितले. यावेळी कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, रेशीम उद्योग इत्यादी योजनेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. असे कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.