वन्यजीव सप्ताह २०२५ उत्साहात साजरा

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9
पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीचे ठकूबाई परशुराम खारपाटील इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज चिरनेर, उरण जिल्हा रायगड येथे महाराष्ट्र शासन वनविभाग अलिबाग वनपरीक्षेत्र उरण व फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह (Wildlife Week) २०२५ साजरा करण्यात आला. वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन व वन्यजीव पुस्तक प्रदर्शन देखील फॉन संस्थेतर्फे भरविण्यात आले होते.या प्रदर्शनामध्ये विविध विषारी, बिनविषारी सापांच्या छायाचित्रांच्या सोबत पक्षी,कीटक, उभयचर,पतंग, फुलपाखरे,तसेच वेगवेगळे प्रकारच्या वन्यजीवांची फॉन संस्थेच्या स्वयंसेवकांनी काढलेली छायाचित्रे प्रदर्शनात दाखविण्यात आली. वनविभागाचे व फॉन संस्थेचे कार्य याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. परिसंस्था का महत्वाचे आहेत तसेच अन्नसाखळी कशी तयार होते, वन्यजीवांचे आपल्या आयुष्यातील स्थान तसेच त्यांचे मानवास होणारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व माहिती सांगून वन्यजीव संरक्षण,वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.वन्यजीव सप्ताह २०२५ साठी मुलांना फॉन संस्थेचे सदस्य व वन्यजीव अभ्यासक निकेतन रमेश ठाकूर यांच्या तर्फे माहिती देण्यात आली व दृकश्राव्य माध्यमातून रायगड जिल्हा पक्षी तिबोटी खंड्या (Black-necked Dwarf Kingfisher) या पक्षाबद्दलचा वन्यजीव छायाचित्रकार मनीष कदम यांनी चित्रित केलेला वन्यजीव माहितीपट दाखविण्यात आला.आताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शाळांमध्ये पर्यावरण शिक्षणाचे धडे व प्रत्यक्ष वन्यजीव आणि निसर्गाच्या संरक्षणाचे धडे व अनुभव मिळावा म्हणून या अश्याप्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन शासनस्तरावर तसेच निसर्ग संवर्धन संस्थामार्फत केले जाते.हा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या मनात वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाचे मूल्य पेरणारा आहे.या कार्यक्रमासाठी एकूण २०० विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकतेर कर्मचारी आणि उरण वनविभागाचे वनरक्षक उपस्थित होते.