मोर्शी आगारामध्ये एसटी बसने वाहकाला चिरडले नादुरुस्त गाडीची ट्रायल घेतानाची घटना

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.8
मोर्शी : मोर्शी बसस्थानकाच्या मागील बाजूला असलेल्या वर्कशॉपमध्ये एका नादुरुस्त बसची दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्तीनंतर बसची ट्रायल घेण्यासाठी मॅकेनिक बस घेऊन बसस्थानकातून येत असताना याच बसखाली वाहकाला व वाहतूक नियंत्रकाला चिरडले. या अपघातात वाहकाचा मृत्यू झाला तर वाहतूक नियंत्रक गंभीर जखमी झाले. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रवीण किसनराव वैराळे ३५ रा. हिवरखेड असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वाहकाचे तर भास्कर होनाजी महल्ले ३७ रा. अंतोरा असे जखमी वाहतूक नियंत्रकाचे नाव आहे. या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी आगाराच्या वर्कशॉपमध्ये कार्यरत असलेल्या तुळशीदास नारायण डाहे ४० रा. ज्ञानदीप कॉलनी मोर्शी याला अटक केली. मोर्शी येथे शनिवारी दुपारी बस क्रमांक एम. एच. ४० एन ८०१५ नादुरुस्त झाली होती. त्यामुळे आगाराच्या वर्कशॉपमध्येच या बसचे काम करण्यात आले. दरम्यान काम पूर्ण झाल्यानंतर वर्कशॉपमध्ये कार्यरत मॅकेनिकल तुळशीदास डाहे या बसची ट्रायल घेण्यासाठी बस बसस्थानकातून बाहेर आणत होता. त्यावेळी वाहतूक नियंत्रक भास्कर महल्ले व बसवाहक प्रवीण वैराळे हे दोघे चर्चा करत होते. त्यावेळी अचानकपणे डाहे चालवत असलेली बस थेट दोघांना चिरडत आली. यामध्ये दोघांनाही गंभीर दुखापत झाली. दरम्यान उपचारासाठी अमरावतीत आणत असताना प्रवीण वैराळे यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच महामंडळाचे अधिकारी मोर्शीत दाखल झाले होते. या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी तुळशीदास डाहेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.