निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षणासाठी बुधवारी परिचय कार्यशाळेचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.9
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अनुसुचित जाती/जमाती) उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत मोफत 18 दिवसीय निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमांचे सविस्तर माहिती मिळण्याच्या दृष्टीने बुधवार दि. 11 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे मोफत उद्योजकता परिचय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक योगेश सारणीकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अनुसुचित जाती/जमाती) उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत मोफत 18 दिवसीय निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उद्योजकीय प्रेरणा, उद्योजकीय गुणसंपदा, विविध संघी मार्गदर्शन, उद्योगाची निवड, उद्योगाचे व्यवस्थापन, उद्योगाला आवश्यक विविध परवाने, शासकीय व निमशासकीय विविध कर्ज योजना, खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे बँकेची कर्ज प्रक्रिया, आदिबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. तसेच प्रशिक्षण पश्चात उद्योग सुरू करण्यासाठी हॅन्ड होल्डिंग सपोर्ट महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केला जाईल.
सदरील प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षणार्थी हा फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीकडे जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, आधार कार्डची छायांकित प्रत असणे गरजेचे असून उमेदवार हा 18 ते 40 या वयोगटातील असणे आवश्यक आहे. असे एमसीईडी विभागीय अधिकारी सुदाम थोटे व प्रकल्प अधिकारी विनोद तुपे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.