क्रीडा संकुलात विविध क्रीडा सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत — पालकमंत्री अतुल सावे
जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि. 25
गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्यासाठी जिल्हा क्रिडा संकुलात सध्या सुरु असलेली विविध क्रीडा प्रकारांच्या पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण समिती विभागाचे मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीस आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह वास्तुविशारद आदींची उपस्थिती होती.
जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलात सध्या विविध विकासांची कामे सुरु आहेत. यामध्ये प्रामुख्याने टेनिस कोर्ट, सिंथेटिक बॉस्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल मैदान, कबड्डी मैदान, खो-खो मैदान, सिंथेटिक स्केटिंग रिंग, आर्टीफिशियल क्रिकेट टर्फ, जिम हॉल, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्त्याच्या कामांचा समावेश आहे. या सर्व कामांचा सविस्तर आढावा पालकमंत्री यांनी घेतला. यावेळी त्यांनी कामाची सद्यस्थिती जाणून घेतली.
पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, जालना जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांसाठी दर्जेदार सुविधा व पोषक वातावरण मिळावे याकरीता जिल्हा क्रीडा संकुलाचा कायापालट करण्यात येत आहे. याठिकाणी सध्या सुरु असणारी कामे गुणवत्तापूर्णपणे वेळेत पूर्ण करावीत.