माजी आमदार मीनाक्षीताई पाटील यांना उरण मध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली.
शोकसभेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
उरण मध्ये समाज प्रबोधन शिक्षण संस्थेच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात माजी आमदार मीनाक्षीताई पाटील यांची शोकसभा पार पडली. यावेळी प्रास्ताविक कामगार नेते संदीप पाटील यांनी केले.यावेळी त्यांनी १९८४ साली शेतकरी आंदोलनात आमदार मीनाक्षीताई पाटील यांचे योगदान आणि त्यांना झालेली अटक तसेच बोकडविरा गावातील त्यांच्या आठवणी सांगितल्या.तालुका चिटणीस विकास नाईक यांनी ताईंना चिटणीस झाल्यानंतर उरणमध्ये भेटलो त्यावेळी त्यांनी मला चांगले काम कर असे सांगितले. त्यांचा प्रेमळ स्वभाव मला भावला असे मत व्यक्त केले.कामगार नेते मेघनाथ तांडेल यांनी ताईंच्या कार्याचा गौरव करून कामे करण्याची पद्धती कशी होती तसेच प्रशासनावर वचक कसा ठेवायचा याबद्दलचे किस्से सांगितले. ताईंचा तळमळ व स्वभाव व शेवटच्या काळातील आठवणी सांगितल्या. ज्येष्ठ नेते काका पाटील यांनी ताईंच्या बद्दल जिव्हाळ्याचे संबंध होते असे नमूद केले. कॉम्रेड भूषण पाटील यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंचायत समितीचे सदस्य महेश म्हात्रे यांनी केगाव मध्ये पाणी समस्या दूर करण्याचे काम तसेच रस्त्यांची काम आमदार मीनाक्षीताई पाटील यांच्या माध्यमातून झाल्याचे सांगितले. महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमाताई यांनी डोंगरी गावातून पाणी समस्या दूर करण्याचे काम मीनाक्षीताई पाटील यांनी केल्याचे सांगितले.तसेच त्यांच्याविषयी प्रेमळ आठवणी सांगितल्या. शहरचिटणीस शेखर पाटील यांनी आमदार मीनाक्षीताई पाटील यांच्या कार्याचा जीवनपटाचा आलेख व विधासभेत मांडलेले विविध प्रश्न विकासकामांचा उल्लेख केला. तसेच उरण अलिबाग मतदारसघात आमदार मीनाक्षीताई पाटील यांच्यासोबत काम करण्याचा सहभाग लाभला. स्वर्गीय प्रभाकर पाटील यांना त्यावेळी जवळून पाहण्याचा योग आला असे सांगीतले. माजी जि. प.सदस्या मीनाक्षी तांडेल यांनी ताईंच्या घरी कधी गेलो तर भेटवस्तू दिल्याशिवाय त्या परत जाऊ देत नसत यावेळी त्यांनी त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. माजी सरपंच रमाकांत म्हात्रे यांनी देखील पेझारीला गेल्यानंतर ताई जेवण केल्याशिवाय परत जाऊ देत नसत असे सांगितले.जनवादी महिला संघटनेचे अध्यक्ष हेमलता पाटील यांनी आमदार मीनाक्षीताई पाटील यांच्यासोबत निवडणूक काम केल्याचे व त्यांच्या स्वभावाबद्दल सांगितले. यावेळी कॉम्रेड मधुसूदन म्हात्रे, सत्यवान ठाकूर, ऍड विजय पाटील,रमेश ठाकूर आदींनी आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सभापती नरेश घरत,उपसभापती महादेव बंडा, सहचिटणीस यशवंत ठाकूर,युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, रमाकांत पाटील,जीवन पाटील,नयन म्हात्रे, शहराध्यक्ष नयना पाटील, किशोर ठाकूर, मु ग पाटील,मनोहर पाटील,किशोर घरत, किरण घरत, शंकर भोईर आदी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मीनाक्षीताईंना अखेरचा सलाम करताना मीनाक्षीताई अमर रहे मीनाक्षी ताईंना लाल सलाम अशा घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले.