महाराष्ट्र

राष्ट्रप्रेरणास्थान माँसाहेब जिजाऊ.-ले.कल्पना घुगे

जालना-दि.11
सिंधू संस्कृती ही बहुजनांची मातृसत्ताक संस्कृती आहे.भारतात मूलतः मातृसत्ताक कुटूंब पध्दती प्रस्थापित होती. परंतु परकीय आर्यांच्या आक्रमणानंतर परकीयांनी लादल्या गेलेल्या पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमुळे स्त्रीयांना अत्यंत हीन दर्जा देण्यात आला. त्यामुळे स्त्रीयांच्या नैसर्गिक बुध्दीमत्तेला,कार्यक्षमतेला अतिशय गौण स्थान प्राप्त झाले. प्रस्थापित समाज व्यवस्थेने स्त्रीयांना स्वतःच असं अस्तित्व निर्माण करण्याची संधीच कधी प्राप्त होऊ दिली नाही. अंधश्रध्देत समस्त स्त्रीयांना गुंतवून,अनेक भाकडकथा त्यांच्यासमोर ठेवण्यात आल्या.तसेच त्यांना धर्माच्या चौकटीत करकचून बांधुन ठेवण्यात आलं. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत स्त्री गुलामीत कशी राहील याचा कडेकोट बंदोबस्त प्रस्थापित समाज व्यवस्थेने केला.गुलामी व्यवस्थेचा पगडा त्यांच्यावर आरुढ करण्यात आला. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतसुध्दा संधी मिळेल तेव्हा,स्त्रीने आपलं अस्तित्व व कर्तृत्व सिध्द केल्याचं आपल्याला आपल्या इतिहासात दिसून येईल.भारतीय इतिहासाला लाभलेलं असचं एक देदीप्यमान स्त्रीरत्न म्हणजेचं स्वराज्य संकल्पिका राजमाता, राष्ट्रमाता,जिजाऊ माँसाहेब…!
अवघं विश्व निर्माण करणारी मातृशक्तीव स्वराज्याकडून सुराज्याकडे नेणारी राष्ट्रभक्ती.यश,किर्ती,स्वाभिमान आणि मातृत्वाचं लेणं यदूवंशाकडून घेऊन,सार्वभौमत्वाचा वारा अंगा खांद्याशी खेळत, सळ-सळत रक्त घेऊन,मराठी मुलुखात संचार करणारी, एक जीवनजागृत असं एक केंद्र,तसेच केवळ विदर्भ, मराठवाडा किंवा महाराष्ट्राचीचं नव्हे तर अवघ्या राष्ट्राची, प्रेरणाशक्ती म्हणजेचं आईसाहेब जिजाऊ…!
ज्या वयात मुली खेळ,भांडे मांडून खेळ खेळण्यात दंग असतात,त्या वयात समशेर हाती घेऊन जिजाऊ पारतंत्र्य,लाचारी,फितुरी या बाबींचा मनापासून तिरस्कार करु लागल्या.गोर-गरिब रयतेचे हाल उघड्या डोळ्यांनी पाहून लागल्या,तशी अन्यायाची आग मनोमन पेटत गेली आणि यातुनचं जिजाऊच्या मनात स्वराज्य संकल्पनेची निर्मिती झाली व स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं. म्हणुनचं म्हणतात,’शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी.’
एकीकडे विचार केला तर गर्भधारणेच्या काळात स्त्रीयांना चिंच, कैरी खाण्याचे डोहाळे लागतात,तर तेचं दुसरीकडे पर्वतावर चढून जावे, सुर्वण सिंहासनावर आसनस्थ व्हावे,उंच ध्वज फडकवावा,नगा-यांचा आवाज ऐकावा, किल्ले जिंकून घ्यावे,असे शिवराय उदरात असताना डोहाळे लागणा-या माँ साहेब जिजाऊ!स्वतः चिलखत घालून, तलवार हाती घेऊन,त्या काळी शत्रूविरूध्द रणांगणात उतरून लढणा-या एकमेव रणांगिनी म्हणजे राजमाता जिजाऊ,या आजच्या काळातील संकूचित विचार ठेवून,मानसिक दबावाखाली मुलांना वाढविणा-या स्त्रीयांनी ख-या अर्थीने समजून घेतल्या पाहिजेत.”शिवबा मृत्यू हा एकदा येणाराचं,तो भ्याडपणाने येण्याऐवजी,तो रणांगणात लढताना येणे हे खरे वीर पुरुषाचे लक्षण होय.आपल्या ध्येयासाठी लढणे गैर नाही,पण आत्मसन्मान, स्वातंत्र्य गहाण ठेवून आपल्याला जगायचं नाही.” त्याचबरोबर “शिवबा केवळ आमचा पुत्र नाही,तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातीच्या स्वातंत्रयासाठी असे कित्येक पुत्र गमावले तरी बेहत्तर. पण भ्याडपणे पळून जाऊन, मराठी मुलुखाचा स्वाभिमान गमावता कामा नये.”असं सांगणारे जिजाऊ विचार खरोखरचं एक स्फुर्ती निर्मीण करणारे आहेत.
वास्तविकतेचा विचार केला तर सध्याच्या काळात सामाजीक परिवर्तन घडवून आणण्यासाठी जिजाऊ विचार समाजात पेरणं खुप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत समाजात जिजाऊ विचार पेरले जाणार नाहीत. तो पर्यंत आपल्या समाजात शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांसारखे महापुरुष जन्माला येणार नाहीत.त्यासाठी समाजात जिजाऊ विचारांचा जागर घडवून आणणे महत्वाचे आहे.जिजाऊ विचार म्हणजे नेमके काय?तर ज्या मातेला आपलं मुल जन्माला आल्यानंतर,त्या मुलाने स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण केलं पाहिजे, पारतंत्र्यात जीवन न खर्च करता, स्वबळावर स्वतःच एक वेगळ विश्व निर्माण केलं पाहिजे, त्यासाठी ती माता कुणाचेही दास्यत्व न पत्कारता स्वतः स्वंयपूर्ण होते व आपल्या मुलाला स्वंयपूर्ण बनवते,हे आहेत जिजाऊ विचार.या प्रेरक जिजाऊ विचारांतूनचं अन्यायाला वाचा फोडून, बेचिराख करुन रयतेचं स्वराज्य प्रस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांसारखे छावे या मराठी मुलुखाला प्राप्त झाले.हे आपल्याला आपल्या सुवर्ण इतिहासाने दाखवून दिले आहे.
‘स्त्री ही क्षणकालाची पत्नी आणि अनंतकालाची माता असते.’हे विधान जिजाऊच्या बाबतीत अगदी यथार्थ आहे. शहाजी राजेंच्या देहावसनानंतर परंपरेप्रमाणे सती न जाता, पतीला परमेश्वर मानून त्याची पूजा करत बसण्यापेक्षा,पतीच्या कार्यात स्वतःला समर्थपणे झोकून देत व समर्थपणे स्वतंत्र राज्यकारभार चालवून भारतीय इतिहासात जिजाऊनी स्त्री कर्तृत्वाचा एक महान असा ठसा निर्माण केला.तसेच ज्या काळात अस्पृश्यांची सावली जरी पडली तरी महापाप समजलं जायचं त्या काळात अस्पृश्यांना समान न्याय,हक्क व आश्रय देऊन सर्वांना स्वराज्याच्या एका धाग्यात गुंफून समाजात परिवर्तनवादी ज्योत पेटवण्याचे काम या माऊलीने केले.यातूनचं जिजाऊंच्या निःपक्षपातीपणाचे व कणखर बाण्याचे दर्शन आपल्याला घडते.जिजाऊंच्या या प्रेरणादायी विचारांचे मंथन आजच्या काळातील प्रत्येक स्त्रीने केले पाहिजे.तेव्हाच प्रत्येक घरा-घरात जिजाऊ निर्माण होतील व या जिजाऊच्या पोटी वीर शिवबांसारखे महान पराक्रमी,महापुरुष जन्माला येऊन,आपल्या राष्ट्राचा उज्वल व देदीप्यमान इतिहास पुन्हा जगासमोर येईल,यात शंकाच नाही.
जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभूराजे!!
लेखक-कु.कल्पना कल्याण घुगे
रा.पिंपरखेड(बु),ता. घनसावंगी, जि.जालना
मो.नं.8390217614

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close