नेरपिंगळाई येथे शांतता समितीची बैठक उत्साहात

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.28
मोर्शी : सण आणि उत्सव हे आनंद, एकोपा आणि सौहार्द वाढवण्याचे साधन असले पाहिजेत. सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन शांततेने आणि प्रेमाने सण साजरे करावेत, यामुळे समाजात बंधुत्वाची भावना वाढते. कोणत्याही सणाचा आनंद वाद-भांडणांमुळे गमावू नये, असे आवाहन शांतता कमिटीच्या बैठकीत शिरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांनी केले.प्रत्येक धर्माच्या सणांना महत्त्व द्या आणि त्या सणांचे औचित्य समजून घेण्याचा प्रयत्न सर्व नागरिकांनी करणे गरजेचे आहे. शक्य असल्यास विविध धर्मीय उत्सवांमध्ये सहभागी व्हा. यामुळे परस्पर समजूत आणि सौहार्द वाढतो. कुठल्याही धर्माचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्ष व्यवहारात कुणाच्याही श्रद्धा दुखावणारे वक्तव्य करू नका. खोटी किंवा भडकावू माहिती शेअर करू नका. कोणतीही धार्मिक पोस्ट शेअर करण्याआधी ती सत्य आहे का, हे तपासा. अफवा आणि चुकीची माहिती समाजात तेढ निर्माण करू शकते. त्यामुळे सणाच्या काळात कुठलाही वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. उत्सव साजरा करताना गोंधळ किंवा गैरवर्तन होणार नाही याकडे लक्ष द्यावे सार्वजनिक ठिकाणी सण साजरा करताना अन्य समाजधर्मियांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहनही ठाणेदार लुले यांनी केले.
शांतता कमिटीच्या बैठकीला गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, पत्रकार, बीट जमादार मनोज कळसकर, पोलिस पाटील राजेश राऊत, वैभव घोगरे यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारी तरुण मंडळी उपस्थित होती.