pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी मान्सूनपुर्व कामे वेळेत पूर्ण करावीत – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

0 3 8 3 5 3

जालना/प्रतिनिधी,दि.15

आगामी मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करुन मान्सून पूर्व करावयाची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ बोलत होते. यावेळी बैठकीस प्र. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश महाडीक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक काजळकर यांची प्रमुख उपस्थिी होती.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान चांगले राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून काम करावे. तसेच  मान्सुनपूर्व काळात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी सतर्क राहावे. अनुचित घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कुठे अशी घटना घडल्याचे कळताच तात्काळ मदत पोहोचेल या पध्दतीने नियोजन करावे. घटनेचा पंचनामा तातडीने करुन त्याचा अहवाल प्रशासनाकडे वेळेत सादर करावा, जेणेकरुन वेळेत आर्थिक मदत देणे शक्य होईल. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणा व नागरिकांना पूर्वसूचना द्यावी. मान्सुन काळात जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी आपत्तीच्या कामात निष्काजीपणा करु नये. यात दोषी आढळल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही डॉ. पांचाळ यांनी यावेळी दिल्या.

मान्सुन कालावधीत सर्व यंत्रणा आणि नागरिकांना दामिनी ॲपचा वापर करण्याचे आवाहन करत डॉ. पांचाळ म्हणाले की, मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी योग्य ती खबरदारी घेवून मान्सून पूर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करावीत. सर्व संबंधित विभागप्रमुखांनी आपले अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेवून त्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात. जिल्ह्यातील मोठे व मध्यम तसेच सर्वच प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करावी. पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषधीसाठा, धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. जिल्ह्यातील गोदावरी, दुधना, केळणा, पुर्णा, गिरजासह इतर लहान-मोठ्या नद्या लक्षात घेता गावांना पुरांचा धोका उद्भवू शकतो.याकरीता नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी पुर रेषा आखणीचे काम तात्काळ करावे. जिल्ह्यात संभाव्य पूर प्रवण 47 गावे आहेत. पूर परिस्थितीमध्ये काय करावे व काय करू नये याची जनजागृती करावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणाची आवश्यक साहित्यांची तपासणी करून घ्यावी. 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना करुन कक्षातील संपर्क क्रमांक अद्ययावत करावेत.  तसेच तालुका स्तरावर देखील 24 तास नियंत्रण कक्ष सुरू करावेत. नगरपालिका, अग्नीशामक, पंचायत, आरोग्य, शिक्षण, पोलीस, कृषी, वाहतूक आदी संबंधीत विभागांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. हवामान खात्याकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचना सर्वांना तात्काळ पोहचेल याची नियोजन करावे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला आराखडा दि. 20 मे, 2025 पूर्वी सादर करावा. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने मदतीसाठी निर्माण करण्यात आलेली यंत्रणा आवश्यक त्या साधनांनी अद्ययावत असल्याची खातरजमा करावी. पावसाळ्यातील संभाव्य साथीचे व जलजन्य आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य व पशुसंवर्धन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. पावसाळ्यात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी व रक्तसाठा उपलब्ध ठेवावा. आरोग्याच्या सुविधा नागरिकांना वेळेत उपलब्ध होण्यासाठी आरोग्य पथकांची नियुक्ती करावी. नदी काठावरील गावात बचाव पथक, यांत्रिकी बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, लाईफ बोयाज पोहणारे व्यक्तींची यादीसह इतर साधन सामुग्रीची उपलब्धता व सुस्थिती तपासुन ठेवावी. पुरपरिस्थितीमध्ये नागरिकांना तात्पुरता निवारा, मुलभुत सुविधा वेळेत उपलबध होण्यासाठी पालिका व तहसील विभागानी सुरक्षीत स्थळांची निवड करता आतापासूनच नियोजन करुन ठेवावे. वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्व नियोजन करावे. नागरी भागातील नाल्याची स्वच्छता करुन घ्यावी. तसेच नागरी व ग्रामीण भागातील धोकादायक इमारती व घरांची पाहणी करुन संबंधीतांना पूर्व सूचना देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी यावेळी दिले.

प्रारंभी मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. नागरिकांनी कोणत्याही आपत्तीत जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल फ्रि क्र. 1077 आणि कार्यालयाचा 02482-223132 या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी पूरस्थितीबाबत पूर्व सूचना, मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प, संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये बाधित होणारी गावे, तसेच पाण्याचा विसर्ग याबाबतही आढावा घेण्यात आला.

            यावेळी बैठकीस उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, आरोग्य विभाग, पुरवठा विभाग, महावितरण, कृषी, पाटबंधारे, जलसंधारण, बीएसएनएल आदी विभाग प्रमुखांची उपस्थिती होती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे