विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी मानव विकास मिशनच्या बसमध्ये विद्यार्थीनींशी साधला संवाद

जालना/प्रतिनिधी,दि.13
विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी आज अंबड तालुक्यातील धनगर पिंपळगाव, किनगाव परिसरातील शालेय विद्यार्थिनी, ज्या कर्जत येथील शाळेत बसमधून जात होत्या, त्या मानव विकास मिशनच्या बसमध्ये प्रवास करत विद्यार्थिनींशी संवाद साधला.
यावेळी अंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी, सुचित कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मंगल धुपे, डेपो मॅनेजर चंद्रजीत गिलचे हे उपस्थित होते. तर मानव विकासच्या बसवर चालक म्हणून किशोर पारवे हे होते.
विभागीय आयुक्तांनी विद्यार्थिनींना विचारपूस केली की, त्यांना शालेय शिक्षण घेतल्यानंतर काय व्हायला आवडेल ? सध्या त्या कसा अभ्यास करतात, मानव विकास मिशनच्या बसचा त्यांना कसा फायदा होतो. यावेळी विद्यार्थिनींनीसुद्धा अगदी मन मोकळेपणाने आयुक्तांशी संवाद साधत आपले मत व्यक्त केले. कोणी एअर होस्टेस होणार असे म्हटले, तर कोणी मी इंजिनियर होणार, असे म्हटले. तुम्ही घरची कामे करता का ? आई-वडील अभ्यासात मदत करता का ? असे अनेक प्रश्न विभागीय आयुक्तांनी विद्यार्थिनींशी बोलताना विचारले.
यानंतर आयुक्तांनी किनगाव येथील प्राथमिक शाळेस भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी मुख्याध्यापक, गावकरी उपस्थित होते. गावकऱ्यांनी आयुक्तांचे स्वागत करुन रिक्त पदे भरण्याबाबत विनंती केली.
दिनांक 29 जून 2006 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र मानव विकास मिशनची स्थापना करण्यात आली होती. मानव विकास कार्यक्रम दिनांक 19.07.2011 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्रातील 23 जिल्हयामध्ये सुरु करण्यात आला असून, जालना जिल्हयातील सर्व 8 तालुक्यांचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे. जालना जिल्हयातील 8 तालुक्यांमध्ये शिक्षण, आरोग्य व उत्पन्न वाढीच्या खालीलप्रमाणे योजना राबविण्यात येत आहेत.
मानव विकास कार्यक्रम राबविण्यासाठी सन 2021-22 मध्ये रू. 1221.00 लक्ष निधी प्राप्त झाला होता. सदरील रू. 1221.00 लक्ष निधी कार्यान्वयीन यंत्रणेस वितरीत करण्यात आला आहे. खर्चाची टक्केवारी 100% आहे. मानव विकास कार्यक्रमास सन 2022 -23 मध्ये एकूण रु.2809.30 लक्ष निधी प्राप्त झाला होता.
त्यापैकी रु.1209.30 लक्ष निधी नियमीत योजनांसाठी व रु. 1600.00 लक्ष निधी तालुका स्पेसिफिक अंतर्गत विशेष निधीसाठी अशा प्रकारे रु.2628.80 लक्ष निधी कार्यान्वयीन यंत्रणेस वितरीत करण्यात आला आहे. खर्चाची टक्केवारी 93.57% आहे. शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी , जालना यांच्यामार्फत ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इ. 12 वी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे याकरिता गाव ते शाळा या दरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सर्वच गावांना एस. टी. वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने तसेच शाळेपासून गावाचे अंतर जास्त असल्याने बऱ्याचशा मुली 8 वी नंतरचे शिक्षण घेवू शकत नाही. यासाठी शासनाने सदरील योजना सुरु केली आहे.
तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती असून या समितीत गटशिक्षण अधिकारी, तालुक्याचे एस टी महामंडळ डेपो मॅनेजर, शाळांचे मुख्याध्यापक सदस्य आहेत. ही समिती शाळा दुर्गमतेचा विचार करून मार्ग निश्चिती करते. जालना जिल्हयात एकूण 56 बसेस सुरू आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी 7 बस याप्रमाणे 8 जालुक्यासाठी एकूण 56 बस उपलब्ध करुन दिल्या आहेत.