नवोपक्रमशील शाळा मराठवाडा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाघरुळ येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.25
सविस्तर वृत्त असे की, जालना तालुक्यातील नवोपक्रमशील म्हणून प्रख्यात असणारी शाळा मराठवाडा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाघरुळ ता. जि. जालना या शाळेने विद्यार्थी हित व विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना नेहमीच वाव देण्याचा प्रयत्न आपल्या नवीन नवीन उपक्रमांमधून केलेला आहे. त्याचेच उदाहरण म्हणून आज दि.21/06/2024 रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी व शाळेतील सर्व शिक्षकांनी आजच्या योगामध्ये सहभाग नोंदवला. सकाळी ठीक 7 वाजेला शाळेच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी योगासने केली. यामध्ये विद्यार्थी सहभाग लक्षणीय दिसून आला. यावेळी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना गाडेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी अवलंबल्या जाणाऱ्या नवनवीन उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, बौद्धिक, सामाजिक, या सर्वांगाने विकास करण्यासाठी शाळा कटिबद्ध आहे असे प्रतिपादन यावेळी बोलताना मॅडमनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्री. प्राध्यापक जाधव सर यांचे लाभले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रमुख यांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले. योगा दिनाच्या कार्यक्रमाची सांगता ही पसायदानाने झाली.