महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का ‘विक्रम’?

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.15
मोर्शी : विधानसभा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होत असल्याने या मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
अमरावती जिल्ह्यातील अन्य सात विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत मोर्शी विधानसभा मतदारसंघाकडे राजकीय धुरीणांचे सर्वाधिक लक्ष लागले आहे. तेथील विद्यमान आमदारांविरोधात त्यांच्या दुसऱ्याच निवडणुकीत कमालीचा विरोध दिसत असून, महायुतीतील भाजप व राकाँ. अजित पवार या मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का ‘विक्रम’? याची उत्सुकता वाढीस लागली आहे.
मोर्शी विधानसभेत सलग दोनदा आमदारकी मिळविण्याचा विक्रम हर्षवर्धन देशमुख व डॉ. अनिल बोंडे यांच्या नावावर आहे. सन १९६२ ते सन २०१९ दरम्यानच्या १३ विधानसभा निवडणुकीत बोंडे व देशमुख वगळता कुणालाही मतदारांनी दुसऱ्यांदा संधी दिली नाही.यंदा मोर्शी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना भाजपचे उमेश ऊर्फ चंदू यावलकर व अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे यांच्याशी झुंज द्यावी लागणार असल्याचे संकेत आहेत.
मोर्शी मतदारसंघात महायुतीतील दोन्ही घटक पक्षांनी आपापले उमेदवार दिल्याने तेथे भाजप व राकाँ. अजित पवार या पक्षात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. मात्र या मैत्रीपूर्ण लढतीमुळे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार कमालीचे अडचणीत आले आहेत.
अमित शाहांचे भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी थेट युतीधर्म न पाळता मोर्शीत भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आग्रही आवाहन केले. तर दुसरीकडे अजित पवारदेखील केवळ रोड शो करून निघून गेले. त्यामुळे भुयारांची वाट अधिकच बिकट झाली आहे.
तिकिटासाठी देवेंद्र भुयारांना करावी लागली भटकंती
वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या विधानसभा मतदारसंघाने भाजप उमेदवार रामदास तडस यांना भरभरून मते दिली होती. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल बोंडे तेथील उमेदवारी भाजपलाच मिळावी, यासाठी आग्रही होते. त्यामुळे देवेंद्र भुयारांना उमेदवारीसाठी मोठी भटकंती करावी लागली.
शेतकरी स्वाभिमान संघटनेला बायबाय करून, बदललेला पक्ष, स्वभावातील आक्रस्ताळेपणा, हर्षवर्धन देशमुखांची सोडलेली साथ या सर्व बाबी भुयारांना मारक ठरल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आग्रही असलेले मात्र सीट राकाँ शरदचंद्र पवार गटाला गेल्याने विक्रम ठाकरे यांनी अपक्ष म्हणून दम ठोकला आहे. त्यांचा फ्रेश व मवाळ चेहरा लोकांना अपील होत असल्याचे निरीक्षण राजकीय निरीक्षकांनी नोंदविले आहे.