कोप्रोली येथे श्री साई चरित्र पारायण व श्री सत्य नारायण महापूजा उत्साहात संपन्न

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.6
दरवर्षी प्रमाणे उरण तालुक्यातील कोप्रोली गावात श्री गणेश मंदिर येथे ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली तर्फे विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काकड आरती, साई बाबांचे मंगल स्नान, श्री साई चरित्र पारायण, हरिपाठ, साई बाबांची धूप आरती, श्री सत्य नारायण महापूजा, दर्शन सोहळा, महाप्रसाद, स्वागत समारंभ असे अनेक विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम कोप्रोली गावात मोठया उत्साहात संपन्न झाले. श्री बापूजीदेव कलामंच व अर्णवी आर्ट कोप्रोली उरण प्रस्तुत साई गीत, लोकगीत, कोळीगीतांचा मराठी नजराणा असलेले नृत्य सादर झाले.या नृत्य कला आविष्काराला नागरीकांनी, भाविक भक्तांनी भरभरून उत्तम प्रतिसाद दिला.शिर्डी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध गायक जगदीश पाटील यांनीही उत्तम आवाज आपल्या शैलीत गायन सादर केले. जगदीश पाटील यांच्या गायनाला रसिक प्रेषकांनी टाळ्या वाजवून मोठा प्रतिसाद दिला.एकंदरीत सर्वच कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले. ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ व साई सेवक ग्रामस्थ मंडळ कोप्रोलीने आयोजित केलेल्या या विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमास श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, सर्व महिला बचत गट, माऊली हरिपाठ मंडळ, सर्व क्रिकेट क्लब, बापूजी देव मंडळ, अर्णवी आर्ट, थ्री व फोर व्हीलर रिक्षा चालक मालक संघटना कोप्रोली व ग्रामस्थ मंडळ कोप्रोली यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यात या सर्वांचे महत्वाचे मोलाचे योगदान लाभल्याने आयोजकांनी या सर्वांचे आभार मानले. एकंदरीत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उरण तालुक्यातील कोप्रोली गावात श्री साई चरित्र पारायण व श्री सत्यनारायण महापूजा मोठया उत्साहात व उत्तम प्रतिसादात संपन्न झाली.