शेतआखाड्यातून बैलांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…
चोरलेले बैल टेम्पोत कोंबून नेताना चौघांना पाठलाग करून पकडले तालुका जालना पोलीसांची कामगिरी.., जनावरे चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता

विरेगाव/गणेश शिंदे,दि.8
जालना तालुक्यातील वानडगाव येथील कृष्णा कारभारी नागवे यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेले दोन बैल रात्री चोरट्यांनी एका छोट्या हाती वाहनात कोंबून चोरून नेली होती.
हे चोरटे त्यांचे वाहन साळेगावमार्गे जालनाकडे जात असल्याची माहिती तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांना मिळाली होती.
श्री. उनवणे यांनी रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांना सतर्क करून संशयित वाहनास पकडण्याच्या सूचना केल्या. पहाटे तीन वाजेच्या सुमारास रामनगर साखर कारखान्याकडून जालन्याच्या दिशेने भरधाव वेगाने एक वाहन येत असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच, इशारा करून त्यास थांबविण्यास सांगतिले.मात्र, सदर चालकाने हे वाहन न थांबविता जालन्याकडे सुसाट वेगाने नेले.
यावेळी पोलिसांनी सरकारी जीपने पाठलाग करून, हे वाहन मंठा रोडवरील चौधरीनगर स्पीडब्रेकरवर पकडले..
वाहनातील चौघा जणांनी उड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
यावेळी वाहनात वानडगाव येथून चोरून आणलेले दोन बैल आढळून आले.
या बैलाबाबत पोलिसांनी चोरट्यांकडे चौकशी करताच, त्यांची भंबेरी उडाली व त्यांनी चोरीची कबुली दिली.
जालना जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांची जनावरे चोरी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ही टोळी जेरबंद करण्यात आल्यामुळे अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची नावे: अल्लाउद्दीन शबीर कुरेशी (वय 24), चालक आकाश किशोर हातगुणे (वय 21), कार्तिक दगडुबा बांडे (वय 20, सर्व रा. गेवराई, जि. बीड) आणि विशाल एकनाथ हिवाळे (वय 21, रा. वडीवाडी, ता. जि. जालना) अशी आहेत.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, पोलीस अंमलदार मानसिंग बावरी, बाळू ढाकणे, सोमनाथ गाडेकर आदींनी ही कामगिरी केली आहे.