युध्दात धारातीर्थी पडलेल्या वीर सैनिकाच्या कुटूंबास एक कोटी अनुदान मंजूर

जालना/प्रतिनिधी,दि.3
सैन्यातील कर्तव्य बजावताना सैन्यात धारातीर्थी पडलेल्या (बॅटल कॅज्यूअल्टी) महाराष्ट्रातील अधिवास असलेले जवान यांच्या कुटूंबीयांना सानुग्रह अनुदान रक्कम रुपये एक कोटी देय असते. त्यानुसार जाफ्राबाद येथील रहिवासी नायक किशोर संतोषराव पारवे यांना दि. 8 ऑगस्ट, 2023 रोजी स्नो लेपर्ड ऑपरेशन मध्ये वीर गती प्राप्त झाली.
महाराष्ट्र शासनाने त्यांचे कुटूंबीयांना एक कोटी रक्कम अनुदान मंजुर केले असून, आज दि. 3 एप्रिल, 2025 रोजी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते स्क्वॉड्रन लिडर (नि.) जिल्हा सैनिक अधिकारी डॉ. सरोदे रुपाली पांडूरंग यांनी जालना जिल्ह्याचे भुमिपुत्र वीर जवान किशोर संतोषराव पारवे यांच्या पत्नी श्रीमती कविता किशोर पारवे तसेच माता कमलबाई संतोषराव पारवे यांना महाराष्ट्र शासनाकडून एकत्रित रक्कम रुपये एक कोटीचा धनादेश शासन निर्णयाप्रमाणे 60 टक्के व 40 टक्के या अनुपातात अदा करण्यात आला. त्यापैकी 80 टक्के शासकीय अल्प बचतीमध्ये गुंतवणूक व 20 टक्के रोखीने अदा करण्यात आले असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.