pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मोर्शीमध्‍ये शेजारी धरण तरीही शेतकर्‍यांचे मरण

0 3 2 1 7 8

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि 12

मोर्शी : शेजारी विस्तीर्ण धरण. त्यात विपुल पाणीसाठाही. परंतु, नजीकच्या शेतातील पिकेच पाण्यावाचून करताहेत. असे प्रचंड विरोधाभासी चित्र जिल्ह्याच्या मोर्शी-वरुड तालुक्यात निर्माण झाले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या जीएसडीए अहवालावरून जिल्हाधिकार्‍यांनी लागू केलेल्या अधीसूचनेचा हा फटका आहे.
अधिसूचनेनुसार, मोर्शी तालुक्यातील अहमदपूर, सदातपूर, दुर्गवाडा, पार्डी, निंभार्णी सिंभोरा व नजीकची काही गावे ‘ओव्हर एक्सप्लॉयटेड झोन’मध्ये अतिशोषित क्षेत्र) समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे तेथील शेतकर्‍यांना शेतात विहिरी खोदण्यास मनाई आहे. याचा उलट परिणाम असा झाला की संबंधित शेतकर्‍यांना ओलीताची शेतीच करता येत नाही. मुळात विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखला जाणारा अप्पर वर्धा प्रकल्प सिंभोरा गावात आहे आणि दुसरी अडचणीची बाब म्हणजे तेथील शेतकर्‍यांनाच जमिनीतील पाण्याचा वापर करता येत नाही. ही अडचण काल-आजची असती किंवा कालांतराने बदलली असती, तर शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असता. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून ती तशीच आहे.
निसर्गचक्र नेहमी बदलत राहते. पावसाच्या पाण्याचे आकडेही दरवर्षी बदलतात. त्याचा थेट परिणाम धरणाच्या पाणीसाठय़ावरही होतो. परंतु, जिल्हाधिकार्‍यांनी घोषित केलेली अधिसूचना मात्र जशीच्या तशीच कायम आहे. त्यामुळे विहिर खोदण्याची आस लावून बसलेल्या शेतकर्‍यांच्या पदरी निराशा आली असून, कोरडवाहू पीकपद्धतीनुसार केवळ एका पिकावरच त्यांना विसंबून राहावे लागत आहे.
फेरआढावा घेण्याची गरज
2022 च्या ग्राउंड वॉटर इस्टीमेट कमिटीने जीईसी 2024 मध्ये केलेल्या पाहणीच्या आधारे सदर अधिसूचना लागू केली आहे. डिसेंबर 2024 मध्ये त्या समितीने रिअसेसमेंट केले. परंतु, सद्य:स्थिती वेगळी आहे. त्यामुळेच त्या भागाचा फेरआढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
दीडशे किमीवर पाणी, शेजारी ठणठणाट
प्रत्यक्ष पाहणी केली असता असे लक्षात येते, की दीडशे किलोमीटर दूर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात या धरणाचे पाणी पोहोचले आहे. परंतु, शेजारी असलेल्या शेतात मात्र ठणठणाट आहे. खासगी वीज उद्योग आणि एमआयडीसीलाही धरणाचे पाणी मिळते. परंतु, सदोष कालवे व चुकीच्या चार्‍या आणि पाटचर्‍यांमुळे धरण क्षेत्रातील शेती मात्र पाण्याविना कोरडी आहे.
पाया खोदला तरी निघते पाणी
नागरिकांच्या मते, दुर्गवाडा, अहमदपूर, सदातपूर, पार्डी, सिंभोरा या गावात बांधकामासाठी पाया खोदला तरी पाणी निघते. त्यामुळे हा भाग अतिशोषित नाही. परंतु, धरणातील बॅकवॉटर लक्षातच घेतले नसल्याने हा गोंधळ उडाला आहे. हा गोंधळ दूर न केल्यास धरण व जमिनीच्या आत भरपूर पाणी असूनही त्याचा वापर करता न येणे ही हतबलता कायम राहणार आहे.
फेरसर्वेक्षण करण्यास सांगू
पाण्याची पातळी वाढल्यास ते क्षेत्र अतिशोषितमधून बाहेर पडू शकते. बॅक वॉटरचा मुद्दा त्यांनी लक्षात घेतला नाही, असे संबंधित शेतकर्‍यांचे म्हणणे असेल, तर जीएसडीएला फेरसर्वेक्षण करायला सांगू. राहुल महिवाल, जिल्हाधिकारी, अमरावती.
धरणाशेजारीच माझी शेती आहे. विहीर खोदण्याची अनेक वर्षांपासून परवानगी मिळाली नाही. प्रत्येक वेळी जिल्हाधिकार्‍यांची अधिसूचना आड येते. केवळ कोरडवाहू शेतीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सुभाष घोटकर, जी-9, एमआयडीसी, अमरावती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे