
0
3
2
1
7
2


जालना/प्रतिनिधी, दि 5
गेल्या नऊ वर्षांत जिल्ह्यामध्ये मूलभूत सुविधांसह विविध विकास कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्याचा मागास हा डाग पुसला गेला आहे. यापुढे निधीअभावी विकासाची कोणतीही कामे रखडणार नाहीत, अशी ग्वाही देतानाच अजूनही विकास कामे करण्याकरिता वाव असून, पत्रकारांनी विकासाची कामे सुचवावीत, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज येथे केले.
जालना शहरातील भारती लॉन्स येथे दर्पण दिनानिमित्त आयोजित सन्मान पत्रकारितेचा सत्कार पत्रकारांचा या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. कैलास गोरंट्याल , आ. नारायण कुचे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, जिल्हा माहिती अधिकारी प्रकाश धोंगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, उपाध्यक्ष भास्करराव दानवे पाटील, भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख उपस्थित होते.
रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, जिल्ह्यात रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण , विद्युतीकरण , आयसीटी , ड्रायपोर्ट आदी प्रकल्पांमुळे जिल्ह्यात अमुलाग्र बदल झाले आहेत. ड्रायपोर्टचे रूपांतर मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्कमध्ये करण्यात आले आहे. जालना जिल्ह्याची इतर जिल्ह्यांशी असलेली कनेक्टिव्हिटी वाढली तरच विकास हा गतीने होऊ शकणार आहे.
मनमाड ते औरंगाबाद ९६० कोटी दुहेरीकरणासाठी मंजूर झाले आहे. या कामाची लवकरच सुरूवात होणार आहे. एक हजार कोटींहून अधिक रकमेसाठी निती आयोगाची मान्यता घ्यावी लागते. म्हणून एक हजार कोटींपेक्षा कमी खर्चाचा प्रस्ताव तयार केला. जालना शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ७३ कोटी रुपये आणले. यातून अंबड येथील फिल्टर बेडचे काम आणि घाणेवाडी जलाशयापासून जालना शहरापर्यंत जलवाहिनी अंथरण्याचे काम केले जाणार आहे. जेणेकरून जालना शहराला नियमितपणे पाणीपुरवठा होऊ शकेल. विद्युत पुरवठ्यासाठी ५०० कोटी केंद्राकडून आणले.
जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. ५० कोटींची रस्त्याची कामे लवकरच सुरू होणार आहेत. जालना हे एकमेव शहर आहे ज्याला सिमेंट काँक्रीटचा बायपास लाभला आहे. आयसीटी इमारतीसाठी २५० कोटी रुपये आणले. यातून टाटा, अंबानी, अदानी यांच्यासारखे उद्योगपती तयार होणार आहेत. जिल्ह्यातील मुलांची गुणवत्ता वाढली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यापुढे जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही असेही दानवे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी प्रमोद धोंगडे, राजेश राऊत यांची समायोचित भाषणे झाली. सूत्रसंचालन साजिद खान, राज रणवीर यांनी केले. कार्यक्रमात पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
प्रा. सुरेश पुरी, प्रा. रेखा शेळके, प्रा.विजय कमळे, प्रा. परमेश्वर रासवे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांचा अल्प परिचय असलेले प्रदर्शन भरविण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक शेळके, राजेश भिसे, लक्ष्मण सोळुंके, दर्पण सकलेचा, गणेश काबरा, शेख मेहजबिन, दिनेश नंद, नरेंद्र जोगड, रवी जैस्वाल, मजहर सौदागर, श्रीकिशन झंवर आदींनी परिश्रम घेतले.
————————————————————–
आ. कैलास गोरंट्याल म्हणाले की, अनेक विषय आपल्याला वर्तमानपत्रातूनच मिळत असतात. त्यामुळे विधानसभेमध्ये विषय मांडताना या वर्तमानपत्रांच्या बातम्यांचा आधार मिळतो. विविध प्रकारची माध्यमे आली तरी वृत्तपत्रांचे स्थान आढळ राहणार आहे , असा विश्वास आमदार गोरंटल यांनी यावेळी व्यक्त केला. जालना शहर महापालिकेत सत्ता आल्यास महापालिकेतर्फे बांधण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकुलांमध्ये पत्रकारांना व्यवसायाकरिता गाळे देण्याचे आश्वासन यावेळी आ. गोरंट्याल यांनी दिले.
—————————————————————
अतिरिक्त जिल्हाधिकारी सरिता सुत्रावे म्हणाल्या की, वर्तमानपत्रांची विश्वासार्हता आजही कायम आहे मला एखादी बातमी कन्फर्म करायची असेल तर मी जवळच्या पत्रकार मित्र किंवा मैत्रिणीला विचारते. आजही माध्यमांमध्ये महिलांचे प्रमाण नगण्य आहे. ते वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
3
2
1
7
2